भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर !
आदित्य घाटगे आणि अशोक जगताप यांना समाजप्रेरणा पुरस्कार
प्रा. जी. बी. कदम यांना जीवन गौरव पुरस्कार
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात दरवर्षी १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते. या जयंती महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने समाजप्रेरणा पुरस्कार दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार संगमनेर येथील यशस्वी फाउंडेशनच्या आदित्य घाटगे आणि तळेगाव दिघे येथील अशोकराव जगताप यांना घोषित करण्यात आला आहे . तर या वर्षी जीवन गौरव पुरस्कारासाठी सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे प्रा. जी. बी. कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा नुकतीच संस्थेच्या बैठकीत करण्यात आली असल्याचे डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद गायकवाड , उपाध्यक्ष ॲड. अमित सोनवणे आणि सचिव गौतम गायकवाड, दिलीप भोरुंडे यांनी सांगितले.

आदित्य घाटगे हा संगमनेरातील एक उत्साही आणि वेगळ्या विचारांचा युवक असून त्यांनी आपल्या कामाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. संत गाडगे बाबांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तालुक्यातील विविध स्मशानभूमी, उद्यानातील कचरा, खराब रस्ते, मेलेली जनावरे, झाडे – झुडपे साफ करण्याचे काम आदित्य आपल्या कुटुंबासमवेत करतो. कोणत्याही शासकीय मदतीविना आदित्य कुठलीही अपेक्षा न करता हे कार्य करीत आहे. रस्त्यावर सापडलेल्या बेवारस भिकाऱ्यांना स्वच्छ करून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आदित्यच्या धाडसाचे उदाहरण बनले आहे. आधुनिक गाडगे बाबा असे आदित्यचे वर्णन केले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा उत्साही कार्यकर्त्याला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळावी या हेतुने हा पुरस्कार देण्याचे निश्चित झाले आहे.

तळेगाव दिघे येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक जगताप यांना देखील समाज प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अतिशय खडतर परिस्थितीत ग्रामीण भागात वंचित घटकांसाठी काम करणारे अशोक जगताप यांचे कार्य देखील दखल घेण्यासारखे आहे. तळेगाव भागातील सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने जगताप हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पुढाकाराने तळेगाव येथे लोकवर्गणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव जयंती महोत्सवात होणार आहे.

शिक्षकी पेशात कार्य करता करता सामाजिक योगदान देणाऱ्या आणि चळवळीत आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सेवानिवृत्त प्रा. जी.बी. कदम यांना या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी संगमनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रसंगी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्काराबद्दल डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर. कदम, उपाध्यक्ष के. एस. गायकवाड, सचिव अण्णासाहेब आडांगळे, सहसचिव ए.पी.बनसोडे, कुसुमताई माघाडे, विनय घोसाळे, रामनाथ जगताप, बाळासाहेब राऊत, कैलास बड, प्रा. शशिकांत माघाडे यांनी पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.

