सुसंवाद हे मालपाणी उद्योग समूहाचे वैशिष्ट्य – डॉ. सुधीर तांबे

कॉम्रेड सहाणे मास्तर स्मृती पुरस्कार

प्रतिनिधी —

कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील सुसंवाद हे मालपाणी उद्योग समूहाचे वैशिष्ट्य आहे. या उद्योग समूहात संघर्ष ऐवजी समन्वय आणि सहकार्य बघायला मिळते. या सामंजस्याची पायाभरणी संगमनेरचे थोर सुपुत्र उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी आणि कामगार नेते दिवंगत कॉम्रेड सहाणे मास्तर या दोन व्यक्तिमत्त्वांनी केली. त्यामुळे उद्योग समूह आणि कामगार या दोन्ही घटकांची सातत्याने प्रगती होत आहे असे गौरवोद्गार विधान परिषदेतील माजी आमदार व संगमनेरचे माजी नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

कामगार नेते कॉम्रेड सहाणे मास्तर यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघ व कॉम्रेड सहाणे मास्तर प्रतिष्ठान यांच्यावतीने कॉम्रेड सहाणे मास्तर स्मृती पुरस्कारांचा वितरण सोहळा मालपाणी इंडस्ट्रियल पार्कच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. तांबे यांनी वरील उद्गार काढले.

यावेळी व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड माधव नेहे, सरचिटणीस ॲड. ज्ञानेश्वर सहाणे, कॉम्रेड सहाणे मास्तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुभाष कडलग, खजिनदार रमेश घोलप आणि कॉम्रेड सहाणे मास्तर विशेष समाजसेवा पुरस्काराचे मानकरी आळंदी जवळील स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. तांबे यांच्या हस्ते देशमाने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेही यावेळी स्नेहवनला 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक सहयोग देण्यात आला. सहाणे परिवाराच्या वतीने रुपये 5 हजारची रक्कम देशमाने यांना भेट देण्यात आली. स्नेहवनच्या सन्मानपत्राचे वाचन मुरारी देशपांडे यांनी केले.

डॉ. तांबे म्हणाले की कॉम्रेड सहाणे मास्तर यांनी वंचितांसाठी आणि श्रमिकांसाठी आपले उभे आयुष्य वेचले. त्यामुळे स्मृतिदिनानिमित्त मास्तरांच्या कर्तुत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. चांगलं काम करणे म्हणजेच देवपूजा अशी विचारधारा असलेले मास्तर कामगारांसाठी चंदनासारखे झिजले.

आमचे कामगार कामातच ’राम’ बघणारे आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला न जाता याच ठिकाणी दिंडीचा आणि पालखीचा भव्य सोहळा ते साजरा करतात आणि मालपाणी इंडस्ट्रियल पार्क पांडुरंगाच्या जयघोषाने दुमदुमून जाते असे राजेश मालपाणी आपल्या भाषणात म्हणाले.

सहाणे मास्तर पुरस्काराचे मानकरी अशोक देशमाने आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या आणि वंचितांच्या अनाथ मुलांचे माऊली झाले. आपण काम सुरू केलं की मदतीला देव येतो याचे स्नेहवन हे अतिशय आदर्श उदाहरण आहे  अशी भावना मालपाणी यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना अशोक देशमाने यांनी स्नेहवनच्या नऊ-दहा वर्षांचा खडतर प्रवास प्रभावी रीतीने मांडला. भक्कम पगाराची आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून अनाथ मुलांच्या सांभाळाचा उपक्रम सुरू केल्यामुळे आलेल्या अनेक अडचणी, विवाह जमण्यात आलेले अनंत अडथळे आणि आजमितिला सुमारे 200 मुलांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करावी लागणारी यातायात याविषयीचे प्रसंग ऐकताना श्रोतेही गहिवरले होते.

मात्र स्वतःपुरते जगून गंजून मरण्यापेक्षा वंचितांसाठी अनाथांसाठी झिजून मरू असा आमचा निर्धार असल्याने आम्ही ही वाटचाल सुरू ठेवली. पत्नी अर्चनाचीही खंबीर साथ मिळाली. स्नेहवनला आळंदी जवळ तब्बल तीन कोटी रुपयांची जमीन दान देणारे दानशूर डॉ.रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. स्मिता कुलकर्णी अशी देवमाणसे ही आयुष्यात भेटली आणि त्यामुळे कामाची उमेद वाढली. आजच्या कॉम्रेड सहाणे मास्तर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सत्कार्याची ऊर्जा अजून वाढली आहे असे देशमाने म्हणाले.

यावेळी मालपाणी उद्योग समूहातील शिला वायकर, रंजना उनवणे, अर्जुन अरगडे या तिघांना कामगार कार्यकर्ता पुरस्कार तर रवींद्र गडगे यांना कामगार क्षेत्रातील विशेष पुरस्कार देऊन तांबे व मालपाणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश पूजन, दीप प्रज्वलन आणि कॉम्रेड सहाणे मास्तर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. ज्ञानदेव सहाणे यांनी केले. कॉम्रेड माधव नेहे यांचेही समयोचित भाषण झाले. सूत्रसंचालन अर्चना शुक्ला तर आभार प्रदर्शन प्रा.सुभाष कडलग यांनी केले. मालपाणी उद्योग समूहातील कामगार सहकारी बंधू-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!