इंद्रायणीने अनुभवला गाथा पुनरूत्थान दिन !

शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला आनंदसोहळा 

प्रतिनिधी —    

शेकडो नागरिकांनी फुलून गेलेला इंद्रायणीकाठ… प्रत्येकाच्या कंठातून उमटणारे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग… त्या अभंगांच्या ध्वनिलहरींवर आरूढ झालेला सारा जनसागर अन् अशा भारावलेल्या वातावरणात साजरा झालेला गाथा पुनरूत्थान दिन…!

‘संत तुकाराम महाराजांची गाथा तरली’ तो चैत्र शुद्ध तृतीयेचा दिवस गुरुवार (दि. ११) गाथा पुनरूत्थान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. गाथा परिवारातर्फे श्री क्षेत्र देहू येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

संत तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या ज्या घाटावर बुडवण्यात आली, त्या घाटावर राज्यभरातून शेकडो भाविक जमा झाले होते. सकाळी साडेआठ वाजताच नदीकाठ आणि परिसर सुशोभित करण्यात आला होता. संत तुकोबारायांची भव्य प्रतिमा घाटाजवळ ठेवण्यात आली होती. अनेक नागरिक त्याभोवती गोळा होत होते. आपल्या भावना व्यक्त करीत होते. तुकोबांपुढे नतमस्तक होत होते. इंद्रायणीलाही मनोमन दंडवत करीत होते. सारं वातावरणच भारावून टाकणारं होतं.

या वातावरणातच आळंदी येथील गाथामूर्ती हभप तुकाराम महाराज घाडगे, गाथा परिवाराचे अध्यक्ष हभप प्रा. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाथा परिवाराचे सदस्य इंद्रायणीच्या आनंद डोहात उभे राहिले. त्यांनी गाथेतील काही निवडक अभंगांचे वाचन केले. त्यांच्या मागे उपस्थित शेकडो नागरिकांनी गाथेतील अभंगांचे पठण केले. तत्पूर्वी गाथा पुनरूत्थान दिन समितीच्या प्रतिमा परदेशी यांनी सोहळ्याची संकल्पना स्पष्ट केली.

इंद्रायणी काठावर तासभर रंगलेल्या या आनंदसोहळ्यानंतर संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी उपोषण केले होते, त्या ठिकाणी गाथा पुनरूत्थान दिनाचा सोहळा पार पडला.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय चित्रकार भास्कर हांडे, देहू येथील गाथा मंदिराचे संस्थापक हभप पांडुरंग महाराज घुले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी देवस्थान देहू गावचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, देहू गावचे माजी सरपंच मधुकर कंद-पाटील, लक्ष्मण कंद-पाटील, अभय महाराज जगताप, उत्तमकुमार इंदोरे, प्रभाकर भोसले, किशोर कडू, विलास बुवा, रवीतात्या कंद, डॉ. चंद्रकांत कोलते, सूर्यकांत शिवले, ज्ञानदेव पांडुळे, सुधीर मेमाणे, ममता झांजुर्णे, सूर्यकांत शिवले, हभप भारत महाराज जाधव, माणिक कदम, श्रीरंग गायकवाड, नाना शिवले, आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब सातव आदी उपस्थित होते.

गाथा परिवाराचे किशोर ढमाले यांनी प्रास्ताविक केले. अभिजित घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. इंदापूर येथील प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांच्या अभंग गायनाने सोहळ्याची सांगता झाली..

इंद्रायणीकाठ जणू बोलू लागला…

या सोहळ्यासाठी राज्यभरातून नागरिक दाखल झाले होते. त्यात तरुण व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक महिला इंद्रायणीच्या काठावरील पायऱ्यांवर बसून मनोभावे गाथेतील अभंगांचे वाचन करीत होत्या. सर्वांनी शुभ्र उपरणे, टोपी असा पेहेराव परिधान केला होता. सारी इंद्रायणी जणू पुन्हा गाथा तरल्याचा तोच आनंद सोहळा अनुभवत होती. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!