गाथा पुनरुत्थान दिन – आनंदोत्सव !

संगमनेरात कीर्तन स्पर्धेचे आयोजन

अभिनेता किरण माने यांच्या हस्ते बक्षीस वितरण

प्रतिनिधी —

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे त्यांचा जीवनानुभव ! आयुष्यात आपण जे अनुभवलं त्याआधारे तुकाराम महाराज समाजाला उपदेश करतात. मार्गदर्शन करतात. दिशा देतात. तुकाराम महाराजांचं साहित्य हे मानव समाजाचं अक्षय धन आहे. असं असूनही धर्मपिठाच्या आदेशाने तुकोबांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली हे सर्वांना माहितीच आहे. गाथा बुडवल्यावर अन्नपाण्याचा त्याग करून तुकाराम महाराजांनी तिथेच एका शिळेवर अंग झोकून दिलं. तेरा दिवसांनी, चैत्र शुद्ध तृतीयेला, गाथा तरली. गाथेचं पुनरुत्थान झालं. हि घटना सर्व गाथाप्रेमींसाठी परम आनंदाची घटना आहे. म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करावा असं गाथा परिवाराने ठरवलं आहे. या गाथा पुनरुत्थान दिनाच्या निमित्ताने संगमनेर येथे दिनांक ९ एप्रिल ते ११ एप्रिल २०२४ रोजी “संगमनेर कीर्तन महोत्सव आणि राज्यस्तरीय भजनस्पर्धेचं” आयोजन करण्यात आलं आहे.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, गाथा परिवाराचे अध्यक्ष हभप उल्हास पाटील, संयोजक दत्ता ढगे आणि श्रीकांत राहणे, हभप रामजी महाराज पवळ, हभप सुनील महाराज भोकनळ हभप अमर महाराज काळे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या गाथेचं पूजन करून या आनंदोत्सवास आणि भजन स्पर्धेला सुरुवात झाली.

संध्याकाळी हभप सत्यपाल महाराज यांच्या सुश्राव्य आणि उद्बोधक कीर्तनाने उपस्थितांचं प्रबोधन केलं. हसत-खेळत, तुकाराम महाराजांच्या अभंगाचे दाखले देत, जगावं कसं ते सत्यपाल महाराजांनी सांगितलं. देव माणसात शोधा. दगडात, मूर्तीत, देवळात देव नाही. अंधश्रद्धा सोडा, व्यसनांपासून दूर रहा, माणसामाणसात भेद करू नका. १० एप्रिल रोजी हभप ज्योती महाराज पाटील, जळगावकर यांच्या कीर्तनाने बहार आणली.

दि. ११ एप्रिल २०२४ रोजी दु. ०२.०० ते ४.०० दरम्यान समाजप्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन होणार आहे. संध्याकाळी ४.३० वाजता अनंतफंदी खुले नाट्यगृह येथून तुकाराम महाराजांच्या गाथेची मिरवणूक निघेल. सदर मिरवणूक सय्यदबाबा चौकातून मेन रोडने माळीवाडा मार्गे परत अनंतफंदी येथे येईल. संध्याकाळी ७.०० वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप आणि भजन स्पर्धेतील विजेत्यांना संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि चित्रपट अभिनेते किरण माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. आमदार  बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीरजी तांबे, उत्कर्षा रुपवते यांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व संगमनेरकरांनी, वारकऱ्यांनी, भाविकांनी ‘गाथा दर्शन’ घेऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांना, त्यांच्या संघर्षाला वंदन करावं असे आवाहन गाथा परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!