संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ !
अवैध धंद्यांचाही सुळसुळाट सुरूच !!

प्रतिनिधी —

संगमनेर शहरासह तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोड्या, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरीला उधाण आले आहे. आणि त्याचबरोबर अवैध धंद्यांचा देखील सुळसुळाट सुरूच आहे.


शहरामध्ये घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मोटारसायकल चोरी तर दररोज होत आहे. त्याचबरोबर सोन साखळी चोरांचेही चांगलेच फावलेले आहे.
ग्रामीण भागात देखील हीच परिस्थिती आहे. पठारातील घारगाव परिसरात आणि पठारात घरफोड्यांचे सत्र वाढल्याने तेथील ग्रामस्थ, व्यापारी आणि पोलिसांमध्ये वादावादी देखील झालेली आहे.
पठार भागात लाखो रुपयांचा ऐवज मागील पंधरा दिवसात चोरीस गेला आहे.

एकंदरीत पाहता संगमनेर शहर व तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव वाढला असल्याचे दिसून येत आहे. हा उपद्रव कधी बंद होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
शहराच्या गजबजलेल्या भागात अशा घरफोड्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. या सर्व प्रकाराने संगमनेरची जनता धास्तावलेली आहे.


संगमनेर मध्ये आता चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाल्याने संगमनेर शहर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
मोठ्या घरफोड्या आणि चोरीची माहिती सह पोलिसांकडून सर्वच दाखल गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रांना मिळेलच असे नाही. ठराविक दाखल गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे. ती पण एक दोन दिवस उशिराने. हा प्रकार सर्वत्रच आहे.

संगमनेर शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. उपनगरांमध्ये तसेच सोसायट्यांमधून मोटरसायकल चोरी होत आहेत. तसेच ज्या ठिकाणी गर्दी नाही अशा ठिकाणी उपनगरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याचे देखील प्रकार घडलेले आहेत.
संगमनेर शहरातील अकोले नाका या ठिकाणी एका संकुलात मोठा गाळा फोडून त्या ठिकाणी घरफोडी करण्यात आली. या ठिकाणाहून सुमारे १ लाख ६७ हजार ४२५ रुपयांचा माल चोरीस गेला. २२ तारखेची ही घटना आहे. पोलिसांकडे नोंद असल्याप्रमाणे. एकंदरीत छोट्या मोठ्या चोर्‍या, पाकिटमारी, भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण तर नेहमीप्रमाणे चालूच आहे. एवढे होत असतानाही अवैध धंद्यांचा सुळसुळाट काही कमी झालेला नाही.

मटका गांजा अवैध धंद्यांची चलती 

अवैध धंद्यांमध्ये नगर जिल्ह्यात संगमनेर एक नंबरवर आहे. विशेषतः “मटका” या धंद्यासाठी संगमनेर तर ‘नगर जिल्ह्याची राजधानी’ म्हणून ओळखली जाते. 

गांजा तस्कर हे हे सुद्धा मागे नाहीत. संगमनेरातील गोवंश हत्या आणि बेकायदेशीर कत्तलखाने तर संपुर्ण महाराष्ट्रात कुप्रसीद्ध  आहेत.

जेवढे काही अवैध धंदे आहेत त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यात संगमनेर एक नंबर वर आहे. मटका टपऱ्या, मटका बुकी चौकाचौकात आपल्याला दिसून येतील. ग्रामीण भागात सुद्धा हा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे. घारगाव, बोटा, तळेगाव, आश्वी या पट्ट्यामध्ये मटका, गुटखा आणि बेकायदेशीर दारू यांचा संगम झालेला आहे. पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नाही. झाली तरी ती दिखाऊ स्वरूपाची असते. काही दिवसांत, नव्हे काही तासातच पुन्हा अवैध धंदे जोमाने सुरु होतात. कारवाई झाल्यानंतरचा हा खेळ जनता नेहमीच पाहत आलेलो आहे. 

वरिष्ठांचे देखील या गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या सर्वांवर भरीसभर म्हणून की काय वाळू तस्करी आणि बेकायदेशीर गौण खनिज उत्खननात देखील संगमनेर आघाडीवर असते.

एकंदरीत नगर जिल्ह्यात सर्व “अवैध धंद्यांचे आगर संगमनेर” बनले आहे, असेच दिसून येते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!