महाविकास आघाडी सरकारकडून निळवंडे कालव्यांसाठी २०२ कोटी रुपयांचा निधी

प्रतिनिधी —

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने महाविकास आघाडी सरकारकडून मोठा निधी मिळत आहे. कोरोना संकटातही या कालव्यांच्या कामांचा वेग कायम ठेवला असून या कालव्यासाठी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून २०२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळवला असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, निळवंडे धरण ध्यासपर्व मानून बाळासाहेब थोरात यांनी हे धरण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केले आहे. दुष्काळी भागाला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच पहिल्या दिवशी या कालव्याच्या कामाला गती दिली. सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देत कोरोना संकटातही अत्यंत बारकाईने पाठपुरावा करून ही कामे वेगाने सुरू ठेवली. विविध ठिकाणी स्ट्रक्चरलची कामे झाली आहेत. २०२२ मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा प्रयत्न असून या सर्व कामी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही मोठे सहकार्य लाभत आहे.

थोरात हे सलग सहा वर्ष कृषिमंत्री असताना नाबार्ड चे विविध अधिकारी यांचे आणि थोरात यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. स्नेहसंबंधामुळे नाबार्डच्या टीमने या कालव्याच्या प्रकल्पाची पाहणी दिवाळीपूर्वी केली होती. हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होत आहे हे लक्षात आल्यानंतर नाबार्डच्या टीमनेही समाधान व्यक्त केले होते. आणि त्यानंतर नाबार्ड अर्थसाह्य योजने मधून कालव्यांसाठी तातडीने २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे कालव्यांच्या  कामाची गती आणखी वाढणार आहे.

सध्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याची कामे अत्यंत वेगाने सुरू असून विविध ठिकाणी स्ट्रक्चरल कामे,  नद्यांवरील पूल, खोदाई काम सुरू आहे. हा निधी मिळाल्याने या कामांचा वेग आणखी वाढणार आहे. जुन २०२१ मध्ये निळवंडे धरणालगतच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक बोगदा खुला करण्यात आला होता. यानंतर या विविध कामांवर जलसंपदामंत्री व विविध संबंधित अधिकारी यांनीही भेटी दिल्या होत्या. या सर्व कामांमध्ये अकोले तालुक्यातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!