एसएमबीटी चे अनोखे ध्वजारोहण ;
संस्थेच्या कर्मचाऱ्याला दिला मान..!
प्रतिनिधि —
देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना संगमनेरातील एसएमबीटी संस्था गेल्या पाच वर्षांपासून आपले वेगळेपण जपत आहे.
यावर्षी विद्यार्थ्यासोबत संस्थेमध्ये वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ध्वजारोहणाचा सन्मान दिला.

सामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून सर्व सरकार काम करत असतात. ७३ वा प्रजासत्ताक दिन देशभरात प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते साजरा झाला. एसएमबीटी संस्थेने मात्र यावर्षी ध्वजारोहणाचा मान हा संस्थेतील एका कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांला दिला.
मुन्ना सय्यद नावाचे हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून संस्थेत वाहन चालक म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी काही काळ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यात देखील सेवा बजावली आहे. गेल्या पाच वर्षापासून ध्वजारोहणाची अनोखी परंपरा जपणाऱ्या या संस्थेत यावर्षी वाहनाचे सारथी असलेल्या मुन्ना सय्यद यांना ध्वजारोहणाचा सन्मान मिळाल्याने या ध्वजारोहणाला एक वेगळी सुखद किनार लाभली.

संस्था एक परिवार असून या परिवारातील सर्वच लहान-मोठे प्रत्येक घटक देखील तितक्याच उंचीचा या परिवारातील सदस्य असल्याचे यातून अधोरेखित झाले.
