संगमनेरातल्या “त्या” सोनारांवर गुन्हा दाखल करा !

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी ; उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आणि विविध चोऱ्या, घरफोड्यांच्या तपासाची चर्चा नेहमीच होत असते. या घटनांमध्ये फारसा बदल झाला नसला तरी पोलिसांच्या कारवाईबाबत मात्र शंका उपस्थित होत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देखील संगमनेर मध्ये असल्याने या कार्यालयातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा तपासात होणारा सहभाग देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

संगमनेर येथील अकील नजीरखान पठाण (राहणार इस्लामपुरा) यांनी यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना निवेदन दिले असून चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांवर कारवाई झाली नाही तर उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

डिसेंबर महिन्यात संगमनेर शहरातील उपनगरात झालेल्या चोरीच्या संदर्भात हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. रहेमत नगर मधील एका व्यक्तीच्या घरात घुसून चोरट्यांनी सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. यासंबंधी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता त्यानंतर पोलिसांनी तपास देखील सुरू केला.

अकील पठाण यांनी दिलेल्या निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांना आरोपी सापडण्यात यश मिळाले होते. या आरोपींनी तीस तोळे सोने चोरले असल्याची कबुली दिली होती. यातील काही सोने हे संगमनेर शहरात विकले असल्याची कबुली देखील त्यांनी दिली होती. यामध्ये शहरातील चार सोनारांचा चोरीचे सोने विकत घेण्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या चारही सोनारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासात पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता असे निवेदनात म्हटले आहे. संगमनेर शहर पोलीस आणि पोलीस उप अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी नेमका कोणता तपास केला आणि या तपासाचे पुढे काय झाले ? हे सगळे गुपीत आहे. अद्यापही चोरीचे सोने घेणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!