सूड उगवण्याच्या नादात प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश परिसराच्या अन्नात माती कालवली…

थोरात – कोल्हेंवर टीका करून तुमचे पाप झाकता येणार नाही — दंडवते

प्रतिनिधी —

गणेश अडचणीत आला होता की प्रवरेच्या नेतृत्वाने जाणीवपूर्वक अडचणीत आणला होता, हे राहाता तालुक्याला पक्के माहित आहे. दडपशाही करून आणि जेलचा धाक दाखवून तुम्ही कारखाना चालवायला घेतला होता. कारखाना चांगला चालवणे तुमची जबाबदारी होती. तुम्ही मात्र गणेश परिसरातील ऊस प्रवरेत गाळला. त्याची रिकवरी कमी दाखवली. टनाला २०० ते ३०० रुपये कमी भाव दिला. शेतकरी आणि कामगारांची देणी थकवली. कष्टाने पिकवलेल्या उसाला वेळेवर तोड मिळाली नाही. शेतकऱ्यांना एकरी दहा ते पंधरा हजार रुपये ऊस तोडणी कामगारांना अतिरिक्त द्यावे लागत होते. अनेक शेतकरी बांधवांना ऊस शेतात जाळावा लागला. गणेश वर सूड उगवण्याच्या नादात प्रवरेच्या नेतृत्वाने गणेश परिसराच्या अन्नात माती कालवली. त्याची नुकसान भरपाई तुम्ही आता करणार का? असा सवाल गणेश चे उपाध्यक्ष विजयराव दंडवते यांनी उपस्थित केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दंडवते म्हणाले, प्रवरा साखर कारखान्याने गणेश कारखाना कराराने चालवण्यासाठी घेतलेला होता. त्यामुळे गुंतवणूक करून कारखाना व्यवस्थित चालवणे ही त्यांची जबादारी होती. ऊस असतानाही तुम्हाला तो व्यवस्थित चालवता आला नाही. हे चालवायला घेतलेल्या नेत्यांचे अपयश आहे. प्रवरा कारखाना गणेशचा ऊस पळवून नेत होते. तोडणीसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे. उसाला भावही कमी मिळत होता. उसाचे पेमेंट कधी मिळेल याची खात्री नव्हती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संचालक मंडळाला संपर्क केला तर ते सांगायचे आम्हाला काहीही माहित नाही. आमच्या हातात काहीच नाही. अशी सर्व परिस्थिती असताना आर्थिक व मानसिक नुकसान टाळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी शेजारील कारखान्यांना संपर्क करून त्यांचा ऊस नेण्यासाठी विंनती करीत होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेजारील कारखान्यांनीही ऊसाला उचित दर देऊन शेतकऱ्यांचा उस नेला यात चुकीचं काय आहे? आपला गणेश यांनी व्यवस्थित चालवला असता तर शेतकऱ्यांनी कशाला दुसरीकडे ऊस दिला असता? हे प्रवरा कारखान्याचे, व्यवस्थापन मंडळाचे व त्यांच्या नेत्यांचे अपयश होते. उगाच आपल्या अपयशाच इतरांवर खापर फोडू नये.

इतर कारखाने व्यवस्थित चालू होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्यावर विश्वास होता. भाव ज्यादा होता. ऊस तोड वेळेत होती. त्यामुळे त्यांनी त्याकाळात ऊस दिला. शेतकऱ्यांनी ऊस फक्त संगमनेर व संजीवनीलाच दिला नव्हता. कोळपेवाडी, अशोक व प्रवरेनेही ऊस नेलेला आहे. गणेश चालवायला घेणाऱ्यांनी मागील आठ वर्षे इतर कारखान्यापेक्षा टनामागे २०० – ३०० रुपये कमी दिले ते शेतकऱ्यांना देणार का? गणेश व्यवस्थित चालत नसल्याने व ऊस तोड वेळेत न आल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाच्या खोडक्या झाल्या. काहींनी आपला ऊस पेटवून दिला त्यांना नुकसान भरपाई देणार का? याचा अर्थ तुम्ही त्या काळात नीट कारभार केला नाही.  तुम्ही शेतकऱ्यांची काळजी घेतली असती, गणेश परिसराच्या उसाला योग्य भाव दिला असता तर आज गणेश परिसराचे नंदनवन झाले असते.

आज गणेश कारखाना चालवत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रवरेच्या प्रशासन आणि कारभाराची सच्चाई समोर आलेली आहे. प्रवरा कारखान्यातून जो अधिकारी वर्ग गणेश कारखान्यात आणून बसवला होता त्याने कधीच गणेशच्या हिताचा विचार केला नाही. शासकीय लेखा परीक्षण अहवालामध्ये तुमच्या आठ वर्षांच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढण्यात आलेले आहेत. अजूनही प्रवरेचे नेतृत्व पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाही, गणेश कारखान्याच्या खोडी काढण्याचे उद्योग सतत सुरू आहेत. गणेश कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या प्रपंचाला हातभार लावायचे सोडून ही नतदृष्ट मंडळी गणेश कारखान्यात राजकारण आणू पाहत आहे. जनतेला सभासदांना सर्व माहीत आहे. योग्य वेळ आल्यावर जनता तुमचा आणखी कठोर बंदोबस्त करेल. असाही इशारा दंडवते यांनी दिला.

प्रवरेच्या नेत्यांनीच गणेश लुटला !

गणेश कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या तोंडून प्रवरेचे नेतृत्व आपले पाप झाकण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यातील अनेक संचालक खाजगीत प्रवरेच्या नेत्यांनी दिलेली वागणूक आम्हाला सांगतात. प्रवरेच्या नेत्यांनी गणेशची लूट केली हे देखील मान्य करतात. असेही दंडवते यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!