थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ !
सहकारासाठी थोरात कारखाना दीपस्तंभ – डॉ. सुधीर तांबे
प्रतिनिधी —
सहकारासाठी आदर्शवत असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने संपन्न झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ – २४ या हंगामाचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या हस्ते झाला. यावेळी बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, व्हा.चेअरमन संतोष हासे, ॲड. सुहास आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यावेळी कृषी शैक्षणिक सहकार क्रांतीचा जागर असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्टिकर चे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. तांबे म्हणाले की, हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भाऊसाहेब थोरात यांनी कायम तत्त्वाचे राजकारण केले असून त्यांनी कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही. अमृत परिवारासाठी राजहंस हा ब्रँड त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तन्मयतेने आणि शिस्तीने ही आदर्श व तत्वे जपत सहकाराला आधुनिकतेची जोड देऊन संगमनेरचा सहकार मॉडेल बनवला आहे.

मॅनेजमेंट कशी असावी तर थोरात सहकारी साखर कारखान्यासारखी अशा प्रकारचे उत्तम काम येथे होत असून हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासासह शैक्षणिक प्रगती ही मोठी झाली असून यामुळे आर्थिक संपन्नते बरोबर समृद्ध प्रगती झाली आहे. ही वाटचाल आपल्या सर्वांना कायम जपायची असल्याचे सांगताना सरकारने मराठा आरक्षणावर तातडीने भूमिका घेत या समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

