गणेश मधील परिवर्तन हाच तुमच्या नाकर्तेपणाचा पुरावा !

२५ कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकली

विखे यांच्या कारभारावर गंगाधर पाटील चौधरी यांचे गंभीर आरोप

प्रतिनिधी —

श्री गणेश सहकारी साखर कारखान्यात प्रवरेच्या नेतृत्वाने भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे ही निव्वळ धुळफेक आहे. कारखान्याची क्षमता तुमच्या नेत्यांनी वाढवली असे तुम्ही म्हणत असाल तर मग, कारखान्याच्या जिंदगीत वाढ का झालेली नाही? या उलट जाताजाता तुमच्या नेत्यांनी २५ कोटी रुपयांची साखर विनापरवानगी विकून सभासद आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील चौधरी यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चौधरी यांनी म्हटले आहे की, श्री गणेश सहकारी साखर कारखाना बंद करणे हा प्रवरेच्या नेतृत्वाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रवरेच्या नेत्यांनी गणेश कारखान्यात भांडवली गुंतवणूक केली, असे म्हणणे हा निव्वळ खोटेपणा आहे. भांडवली गुंतवणूक सोडा याउलट प्रवरा कारखाना गणेश कारखान्याकडे ८२ कोटी रुपये मागतो आहे, हे पैसे नेमके कशाचे? याचे उत्तर द्यायचे सोडून प्रवरेच्या नेत्यांचे समर्थक खोट्या-नाट्या गोष्टी सांगत फिरत आहेत.

गणेश कारखाना चालवताना प्रवरा कारखान्याने कराराचे पालन केले नाही. करारा पूर्वी ज्या गोष्टी ठरल्या होत्या, ज्या प्रवरा कारखान्याने देणे अपेक्षित होते त्या सुद्धा प्रवरेने पूर्ण केलेल्या नाही. प्रवरा कारखान्याने गणेश चालवायला घेताना, उसाचे काही किरकोळ पेमेंट देणे कबूल केले होते, आज दहा वर्षानंतरही ते पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ती जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळाची नाही तर प्रवरा कारखान्याची होती.

विद्यमान संचालक मंडळाने गणेश कारखाना ताब्यात घेतला तेव्हा, दोन कोटी रुपयांचे शासकीय देणे बाकी आहे. जीएसटी, वीज बिल गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे देणे, मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर विविध शासकीय देण्याचा त्यात समावेश आहे. कामगारांची देणी, इतर ही बोजा वाढवून ठेवलेला आहे.

एक कोटी रुपयांची पाणीपट्टी प्रवरेच्या व्यवस्थापनाने थकाविलेली आहे. या शिवाय जून महिन्यामध्ये गणेश कारखान्यात २५ कोटी रुपयांची साखर आणि मोलासेस असणे अपेक्षित होते मात्र, प्रत्यक्षात एकही साखरेचा दाणा कारखान्यात शिल्लक ठेवलेला नाही. एका बाजूने कारखान्याची लूट करायची आणि दुसऱ्या बाजूने नवीन संचालक मंडळाला काम करू द्यायचे नाही, अशी कपटनीती प्रवरा कारखान्याने अवलंबलेली आहे.

१४ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवरा कारखान्याने प्रादेशिक साखर सहसंचालकांना पत्र लिहून, गणेश साखर कारखान्यास आवश्यक असणारे शासकीय परवाने देण्यात येऊ नये असे कळविले आहे. सप्टेंबर रोजी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करून गणेश कारखान्याकडे ८२ कोटी रुपये घेणे असल्याचे प्रवरा कारखान्याने सांगितले, त्या बदल्यात कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा मागितलेला आहे. जिल्हा बँकेला पत्र देऊन गणेश कारखान्याला कर्ज देऊ नये असे सांगणारे ही प्रवरेचे नेतेच होते. आजही गणेश बंद कसा पडेल आणि गणेशला ऊस कसा मिळणार नाही यासाठी प्रवरेचे व्यवस्थापन आणि नेतृत्व प्रयत्नशील आहे. जेव्हा सभासद सांगतात की आम्ही प्रवरेला ऊस देऊ शकत नाही, तेव्हा त्याच सभासदांना कोळपेवाडीला ऊस घालण्यासाठी कोण भाग पाडते? प्रवरा कारखाना आणि त्यांच्या नेत्यांचे सर्व बुरखे फाटलेले आहेत. गणेश परिसराने त्यांना आता पुरते ओळखलेले आहे. त्यामुळे कोणी कितीही खोटे सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही गणेश परिसर प्रवरेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार नाही.

सभासद प्रवरेच्या नेत्यांना ओळखून आहेत

जो कारखाना आठ वर्ष आपल्याला चालवायला जमले नाही तो कारखाना इतक्या असंख्य अडचणी येऊनही थोरात-कोल्हे सुरळीत चालवत आहेत, हे सहन न झाल्यानेच प्रवरेच्या नेतृत्वाने सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र गणेशचा स्वाभिमानी सभासद शेतकरी आणि कामगार प्रवरेच्या नेतृत्वाचा हेतू शंभर टक्के ओळखून आहे, असेही चौधरी म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!