समन्यायी पाणी वाटपाचे तत्व मान्य नाही – आमदार बाळासाहेब थोरात
थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न
प्रतिनिधी —
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर मागील ५६ वर्षात यशस्वी वाटचाल केली असून सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि जनतेचा विश्वास हेच आपले मोठे भांडवल आहे. समन्यायी पाणी वाटपाचे तत्व आपल्याला मान्य नाही. याबाबत संगमनेरनेच पहिला आवाज उठवला असून निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठीच आपण पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ हे होते तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, उत्कर्षा रुपवते, व्हा.चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी हिराबाई व मिनानाथ वर्पे, सुरेखा व डॉ. तुषार दिघे, लता व माणिक यादव, सिंधु व संभाजीराव वाकचौरे, मंदा व शेखर वाघ या संचालकांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.

आमदार थोरात म्हणाले की, नवीन कारखान्यासोबत को -जनरेशन चा निर्णय योग्य ठरला. मागील ५६ वर्षात कारखान्यासह सहकाराची अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. नवीन कारखान्यातून मागील सात वर्षात ७३ लाख मे. टनाचे गाळप झाले. को -जनरेशन ला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक या सर्वांचा मोठा विश्वास कारखान्यावर असून हेच आपल्यासाठी मोठे भांडवल आहे.

यावर्षी पाऊस कमी झाला असून दुष्काळी परिस्थितीमुळे हा हंगाम कठीण आहे. समन्यायी पाणी वाटपाचे तत्व काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरवले गेले. हे तत्व आपल्याला मान्य नाही. या विरोधात संगमनेरनेच प्रथम आवाज उठवला व आंदोलने केली.

निळवंडे धरण व कालवे हे आपण दुष्काळी भागातील जनतेसाठीच बांधले आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम पूर्ण केले आहे. खरे तर मे महिन्यामध्ये दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यावेळेस सर्व बंधारे, नाले भरून घेता आले असते. मात्र संगमनेर तालुक्यात साजरा झालेला आनंदोत्सव काहींना पाहावला नाही. त्यावेळेस पाणी बंद केले.

सध्या अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र हा तालुका क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. कठीण परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणार आहोत. सत्ता येते आणि जाते.आगामी काळ हा आपलाच असून काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे सांगताना आपण कधीही कुणाची वाईट केले नाही, चांगले करण्यासाठीच गणेश परिसरात आपण गेलो आहोत असेही ते म्हणाले.

डॉ. तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सर्वाधिक २८३५ रुपये भाव दिला आहे. निळवंडे धरण कोणी केले हे सर्वश्रुत आहे. काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता त्यांना ओळखून आहे. राजहंस हा सहकाराचा बँड असून तो विवेकाचा ब्रँड आहे. दुष्काळी तालुक्यातील सहकार राज्यात प्रथम क्रमांकाचा केवळ नेतृत्वामुळे ठरला आहे. सरकारने सुरू केलेली खाजगी शिक्षणाची व कंत्राटीकरणाची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची टीकाही डॉ .तांबे यांनी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर संतोष हासे यांनी आभार मानले.

