थोरात कारखान्याच्या यंत्रणेकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत
गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जीवनाचा ध्यास मानून धरण व कालवे पूर्ण केले आहे. या कालव्यांमधून पाणी सोडावे या मागणीला आलेल्या यशानंतर बिना अडथळा व विना गळती हे पाणी सुरू रहावे यासाठी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने डाव्या कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी रात्रंदिवस केलेल्या मोठ्या मदतीची माहिती आमदार थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, आमदार थोरात यांनी डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडून दुष्काळी भागाला दिलासा द्यावा ही मागणी नुकतीच केली होती. यानंतर मागणी व पाठपुराव्याला यश येऊन निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

मे महिन्यातही आमदार थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारकडून पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळेस काही ठिकाणी कालव्यांमधून गळती झाली होती. त्यावेळेसही कागद टाकण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळात गळती थांबवण्यासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. परंतु यावेळेस अधिक सुरक्षितता म्हणून अशी पाणी गळती होऊ नये व विना अडथळा आवर्तन सुरू राहावे याकरता पाटबंधारे विभागाच्या वतीने डाव्या कालव्यामध्ये प्लास्टिक कागद टाकण्यात आला आहे.

हा प्लॅस्टिक कागद टाकण्याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेने कोणतीही प्रसिद्धी न करता रात्रंदिवस अविश्रांत काम करून प्लास्टिक कागद टाकण्यासाठी मोठी मदत केली आहे. त्यामुळे गळती न होता डाव्या कालव्यातून पाणी लवकरात लवकर पुढे जाऊन जास्तीत जास्त दिवस आवर्तन सुरू राहील याकरता काम होत आहे.

थोरात कारखान्याच्या यंत्रणेने रात्रंदिवस केलेल्या कामाबद्दल आणि प्लास्टिक कागद टाकण्याकरता दिलेल्या मदतीबद्दल डाव्या कालव्यातील लाभक्षेत्रातील नागरिकांकडून कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, डेव्हलपमेंट विभाग यांसह यंत्रणेचे अभिनंदन होत असून या केलेल्या मदतीमुळे लाभक्षेत्रातील गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

