महिला बचत गटाची जिल्ह्यातील पहिली सुपर शॉपी घुलेवाडीत सुरू
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले असून घुलेवाडी येथे ३० बचत गटांच्या माध्यमातून यावर्षी जिल्ह्यातील पहिली महिला बचत गटाची सुपर शॉपी सुरु झाली असून हा अभिनव उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.
घुलेवाडी येथे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटाचे सुपर शॉपी चे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, व्यवस्थापक रवींद्र खराटे रेश्मा पाटील, प्रशांत पानसरे, ग्रामविकास अधिकारी कुटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जोर्वेकर म्हणाल्या की, दोन वर्षापूर्वी महिलांनी एकत्र येऊन गावांमध्ये ३० महिला बचत गटांची स्थापना केली. या बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, महिलांची आरोग्य सक्षमीकरण यावर भर देण्यात आले. मात्र कोरोनाचे संकट आले आणि बरेच कामकाज थांबले. तरी ही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यातील पहिली सुपर शॉपी घुलेवाडी येथे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व महिला भगिनींना मोठा सहभाग असून महिलांना बळकटी दिली तर त्या कुटुंबाप्रमाणे समाजाचे चांगले व्यवस्थापन करू शकतात.
या महिला सुपर शॉपी साठी ग्रामपंचायत ने मोठे सहकार्य केले असून उमेद बरोबर केलेल्या करारा मुळे एचडीएफसी बँकेत सुपर शॉपी साठी कर्ज पुरवठा केला आहे. या सर्वांच्या सहकार्यातून हा अभिनव उपक्रम नक्की यशस्वी होईल असे त्या म्हणाल्या.
अरगडे म्हणाले की, एचडीएफसी बँक आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या सहयोगातून होत असल्याने ही सुपर शॉपी इतर सर्व गावांसाठी महत्त्वाची व मार्गदर्शन करणारे असून सर्वांनी या सुपर शॉपी इथूनच खरेदी करावे.
गटविकास अधिकारी अनिल नागणे म्हणाले की, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून गावातील नागरिक व शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा या सुपर शोपी मधूनच खरेदी करावे यापुढेही इतर गावांमध्ये महिला बचत गटांचे काही उपक्रम असतील तर शासनाकडून व पंचायत समितीकडून त्यांना नक्की सहकार्य करू असेही ते म्हणाले.
या अभिनव उपक्रमाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर, सुनील कुमार पठारे, मंजुषा धीवर, ज्ञानेश्वर गव्हाणे, निर्मला गुंजाळ, जि. प. सदस्य सिताराम राऊत, सरपंच दत्तू राऊत यांनी अभिनंदन केले आहे.
