सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात “गोधन” योजनेचा शुभारंभ
राजहंस दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार
प्रतिनिधी —
राज्यात अग्रेसर असलेल्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोधन योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते बुधवारी राजहंस दूध संघ, अमृतनगर या ठिकाणी करण्यात आला.
यावेळी बाजीराव खेमनर, साहेबराव गडाख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ मेंनेजर प्रीतमसिंह चव्हाण, लक्ष्मण कुटे, आर बी रहाणे, मोहन करंजकर, सुभाष आहेर, विलास वर्पे, माणिक यादव, विलास कवडे, पांडुरंग सागर, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहीज, राजेंद्र चकोर, वाघ साहेब, कार्यकारी संचालक डॉ प्रतापराव उबाळे, डॉ सुजित खिलारी, धनंजय बागुल, वैभव कदम, अमर गोपी, रमेश कोळगे, अँड. सुरेश जोंधळे, व दुध संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, दूध उत्पादनामध्ये संगमनेर तालुका राज्यात प्रगतिपथावर आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संगमनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायातील योगदान मोलाचे आहे. राज्याचे राजहंस दूध संघाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाला दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादकांना अल्प व्याजदर, कमी वेळेत व कमी कागदपत्रांमध्ये दोन गाई खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे. या कर्ज योजनेसाठी दूध उत्पादकाला आपली मालमत्ता तारण ठेवण्याची गरज लागणार नाही. व जामीनदाराची ही आवश्यकता नाही.
राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये गोधन योजनेची भर पडल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनात प्रगती साधण्यासाठी नवसंजीवनी मिळणार आहे. राजहंस दूध संघ सरासरी दुधाला भाव देण्यात सर्वात पुढे असतो.
तर राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या दुधावरील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी यशोधन संगमनेर, रायतेवाडी फाटा, जोर्वे, कोकणगाव या ठिकाणी राजहंस मेडिकल स्टोअर सुरू केले आहे. राजहंस मेडिकलच्या माध्यमातून दूध उत्पादकांना माफक दरात औषधे पुरवठा केले जातात.
