राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रम अधिक कार्यक्षम बनवणे शक्य — अनिल राठी

प्रतिनिधी —

परिवर्तन ही काळाची गरज आहे. समाजाच्या बदलत्या गरजांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात सातत्याने योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. अद्ययावत अभ्यासक्रमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य संपादन करणे शक्य होईल. असे मत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अनिल राठी यांनी व्यक्त केले.

संगमनेर महाविद्यालय संगमनेर व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “एम.ए अर्थशास्त्र भाग -१ अभ्यासक्रम  पुनर्रचना” या विषयावर संगमनेर महाविद्यालयामध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यशाळेचे प्रमुख अतिथि प्रो.डॉ.सुनिल उगले तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.रविंद्र ताशिलदार, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम समन्वयक प्रो. डॉ.गोरक्षनाथ सानप आदी उपस्थित होते.

राठी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रम अधिक व्यवहारिक कार्यक्षम बनविणे शक्य आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या विविध संधी वाढविण्यास आपणांस मदत होणार असल्याचे यावेळी सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्राचार्य अरुण गायकवाड यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रचना यावर बीजभाषण दिले. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक  रचनेमध्ये  अमुलाग्र बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एकाच वेळी विविध विद्याशाखांमधील विषयांचे ज्ञान मिळवू शकणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी व पदव्युत्तर स्तरावरील बदलेल्या अभ्यासक्रम रचनेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच गुणवत्ता वाढीसाठी नविन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक नविन संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र मंडळाचे चेअरमन प्रो.डॉ. सुनिल उगले म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुळ हेतू विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व व्यावहारिक ज्ञान देणे हा आहे. त्यानुसार अर्थशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाची  पुनर्रचना करण्याचे अवाहन त्यांनी उपस्थित सदस्यांना केले.

कार्यशाळेच्या पुढील सत्रात सावित्रीबाई फुले पुणे अर्थशास्त्र अभ्यास  मंडळाच्या सदस्यांनी व उपसमिती सदस्य यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचे सादरीकरण केले.

कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातील सुमारे ६५ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.  कार्याक्रमाचाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र डॉ. गोरक्षनाथ सानप यांनी केले, डॉ. बापुसाहेब शिंगाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला व सत्काराचे निवेदन केले. सुत्रसंचालन डॉ. प्रताप फलफले यांनी केले तर डॉ. कैलास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्थशास्त्र विभागातील डॉ. गणेश जैतमल, डॉ. अर्चना हासे आदी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांचे सहकार्य लाभले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!