संगमनेरात ७५० किलो गोवंश मांस पकडले !

प्रतिनिधी —

शहरातील भारतनगरमध्ये असलेल्या सरवर हाजी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची टीप पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली. निरीक्षक मथुरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश देताच पोलीस पथकाने घटनास्थळी केलेल्या कारवाईत १ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचे ७५० किलो गोमांस मिळून आले आहे. कारवाईची चाहूल लागताच कत्तलखाना चालक सरवर हाजी तेथून पसार झाला.

अनेकदा झालेल्या कारवायानंतर देखील संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यातून दररोज शेकडो गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच असल्याचे अनेकदा पोलीस कारवायानंतर समोर आले आहे. कत्तलखाने नामशेष करण्यास प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते.

संगमनेरातील कत्तलखान्यातून दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने येथील कत्तलखान्यांची राज्यात बदनामी झाली आहे. कोणत्याही पोलीस कारवाईला न घाबरणारे कत्तलखाना चालक वारंवार गोवंश जनावरांच्या कत्तली करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुरुवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भारतनगरमधील सरवर हाजी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. निरीक्षक मथुरे यांनी तातडीने पोलीस कर्मचारी कानिफनाथ जाधव यांच्यासह पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता कत्तलखाना चालकाला पोलिसांची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेत तो तेथून पळून गेला. पथकाच्या चौकशीत त्याचे नाव सरवर हाजी असल्याचे स्पष्ट झाले.

पथकाने पत्र्याच्या शेडमध्ये पाहणी केली असता त्यांना गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले. पोलिसांनी १ लाख ८७ हजार ५०० रुपये किमतीचे अंदाजे साडेसातशे किलो गोमांस ताब्यात घेतले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पळून गेलेल्या सरवर हाजी याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 269 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारित कलम 5(अ),5(क), 9(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!