नगर पोलीस अधीक्षकांनी भाकरी फिरवली, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक कधी फिरवणार ?
शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यात साफसफाई ची आवश्यकता !
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून बरेच दिवस होऊन गेले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि शहरात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून एकाच विभागात आणि एकाच पोलीस स्टेशन मध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करून इतके दिवस झाले असले तरी बरेच पोलीस कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील ही बदल्यांची भाकरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कधी फिरवणार आणि अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तावडीतून शहर पोलीस स्टेशन कधी मुक्त करणार ? याची संगमनेरकर वाट पाहत आहेत.

अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरात अनेकांशी हितसंबंध निर्माण झाले आहेत. हे हितसंबंध शहराची शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर शहरात जोर्वे नाका परिसरात घडलेल्या घटनेला पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती देखील कारणीभूत ठरली आहे. काही वर्षांपासून संगमनेर शहरात आलेल्या पोलीस निरीक्षकांनी केलेले वादग्रस्त काम आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यात घेतलेला सहभाग यामुळे संगमनेर शांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पोलीस काहीच करत नाहीत अशी गुन्हेगारांची व गुंड प्रवृत्तींची मानसिकता झाली होती.

संगमनेर शहरात चालणारे अवैध व्यवसाय, अनधिकृत कत्तलखाने यामुळे संगमनेर शहर पोलिसांचे पूर्ण राज्यभर वाभाडे निघाले होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्हे तर काही पोलीस कर्मचारी देखील यात त्या वेळी बदनाम झालेले आहेत. बाबत अनेक वेळा तक्रारी देखील झाल्या आहेत.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नुकत्याच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात साफसफाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर शहरात ठाण मांडून बसलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या छुप्या हितसंबंधांमुळे शहरातील तणाव निर्माण होत असल्याचे किंवा त्याला खत पाणी घातले जात असल्याची चर्चा आहे. बदल्या होऊन देखील शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यास तयार नाहीत. या मागचे नेमके गौडबंगाल काय ?

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आणि हद्दीत असे कोणते “लोहचुंबक” आहे की बदली होऊनही शहर पोलीस ठाणे सोडावेसे वाटत नाही. याची एकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची गरज आहे.
अनेक वर्षांपासून हितसंबंध निर्माण झाल्यामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये सुद्धा हितसंबंध निर्माण झाल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे शहरातले अवैध धंदे फोफावले असल्याचीही चर्चा आहे. राजकीय पुढारी, संघटनांचे नेते यांच्याशी देखील ओळख आणि जवळील निर्माण झाल्याने शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर हे संबंध नेहमीच अडचणीचे ठरले आहेत.

नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नंतर लगेचच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील काही जण अद्यापही शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. ते कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. पोलीस निरीक्षक अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी का घालत आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

