अवैध वृत्तीने केलेली कृत्ये हटविण्याचा “फार्स” हा भविष्यात सत्ताधारी, पोलीस आणि प्रशासनाच्या गळ्यातील “फास” होणार !
एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी संगमनेर शहराचे किती वाटोळे करणार ?
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात नेहमीच सर्व क्षेत्रातल्या अवैध वृत्तीने केलेली कृत्ये आणि अतिक्रमण काढण्याचा “फार्स” भविष्यात संगमनेरच्या सत्ताधारी, पोलीस आणि प्रशासनाच्या गळ्यातला “फास” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतांच्या राजकारणासाठी स्थानिक नेतृत्व नेहमीच अशा अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करीत आलेले आहे. काही संधीसाधू विरोधकही त्यात आपले हित साधून घेत आहेत. भविष्यात हाच भस्मासुर नेतृत्वाच्या राजकारणावर अशांततेचा हात ठेवून सत्ताधाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.

संगमनेर शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. याआधी किरकोळ भांडणांमधूनच संगमनेर शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेला नेहमीच गालबोट लागलेले आहे. रिक्षा चालकाच्या किरकोळ भांडणांमधून संगमनेर शहरात दंगली घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर नगरपालिकेतील राजकारणात आपापला हेतू साध्य करण्यासाठी देखील धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून, हाणामाऱ्या करून, गुंडगिरी करून आपापल्या राजकीय पोळ्या भाजण्यात काही मंडळी यशस्वी झाली होती.

पुन्हा तोच खेळ संगमनेर मधे आता सुरू झाला आहे. संगमनेर शहरातल्या सर्वच अवैध कृत्यांवर पांघरून घालण्याचे काम स्थानिक नेतृत्वाने कायम केले आहे. अवैध कृत्यांना आळा घालण्यात संगमनेरचे पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व कधीही यशस्वी झालेले नाही. मतांच्या राजकारणासाठी अवैध धंदे आणि उद्योग करणाऱ्यांना नेहमीच सत्ताधाऱ्यांकडून पाठबळ देण्यात आले. या पाठबळाच्या जोरावर अवैध धंदे करणारे आणि त्याचबरोबर अवैध कृत्य करणारे सर्वत्र फोफावले आहेत.

संगमनेर शहरात अवैध बांधकामे, अतिक्रमणे याचा सुळसुळाट झालेला आहे. या अतिक्रमणांमुळे अनेक वेळा वाद देखील निर्माण झाले आहेत. प्रशासन यात कुठलीही कठोर भूमिका घेताना दिसलेले नाही. शहरात होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमणाची जबाबदारी संगमनेर नगरपालिकेची असते. संगमनेर नगरपालिकेने अतिक्रमण होऊ न देणे आणि झालेली अतिक्रमणे त्वरित काढणे यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत परंतु तसे होताना दिसत नाही. न्यायालयाचे आदेश असताना देखील शहराचे विद्रूपीकरण थांबलेले नाही. नगरपालिकेत स्वतंत्र विभाग असून देखील कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.

शहरातल्या चौका चौकात गल्लीबोळात अतिक्रमण झालेले दिसून येते. या अतिक्रमणांना पाठीशी घालण्यात त्या त्या भागातले काही नगरसेवक, विरोधी पक्षातील काही नेते, काही संघटनांचे राजकीय पुढारी नेहमीच आघाडीवर असतात. स्थानिक सत्ताधाऱ्यांकडे नगरपालिकेची एक हाती सत्ता असून देखील अतिक्रमणे हटविण्यात नगरपालिका आणि त्यांची सत्ता कधीही यशस्वी झालेले नाहीत. मुळात त्यांना अतिक्रमण हटवायची नाहीत. हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

प्रत्येक वेळी अतिक्रमणे हटविण्याचा फार्स करण्यात येतो आणि पुन्हा त्याच जागेवर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे एक गठ्ठा मतांसाठी किती “हाजी हाजी” करणार याचा विचार स्थानिक नेतृत्वाने करायला हवा. भविष्यात या अवैध कृत्यांना पाठीशी घातल्यामुळे आणि अतिक्रमणे किंवा अवैध धंद्यांना संपवण्याचा फक्त “फार्स” केल्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन व पोलिसांच्या गळ्यातला तो कायमस्वरूपी “फास” होऊ शकतो आणि त्याचे परिणाम संगमनेरकरांना भोगावे लागतील असे चित्र आता संगमनेर दिसू लागले आहे.

