माळुंगी नदीवरील पूल आणि थोरात विखे समर्थकांची कागदी घोडे स्पर्धा !
विखेंच्या पत्रामुळे जनतेत संभ्रम ! आमदार थोरात यांचे पत्र साडेचार महिन्यापूर्वीचे…..

संगमनेरातील माळुंगी नदीवरील तुटलेल्या पूलाची जोरदार राजकीय कहाणी सुरू झाली असून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या समर्थकांची सोशल मीडियात सुरू असलेली कागदी घोडे नाचवण्याची स्पर्धा नागरिकांना करमणुकीचा विषय ठरली आहे. मात्र माळुंगी नदीवरील पूल लवकरात लवकर उभा करणे हा मूलभूत प्रश्न यामध्ये मागे पडत चालला आहे !

प्रतिनिधी —
संगमनेर शहरात असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिर दरम्यान माळुंगी नदीवर असलेला पूल सहा महिन्यापूर्वी तुटला. हा पूल तुटल्यानंतर येथून होणारी वाहतूक ठप्प झाली. नगरपालिकेने दुसरी कडे तातडीने पर्यायी पूल उभा केला आहे. मात्र मुख्य पूल तुटल्या पासून ते आज पर्यंत फुल तशाच अवस्थेत पडलेला असून पूल कधी होणार याबाबत थोरात – विखे समर्थकांमध्ये मात्र राजकीय सुंदोपसुंदी सुरू आहे. असे असतानाच आता कोणी किती प्रयत्न केले याची प्रशासनाला दिलेली पत्रे सोशल मीडिया वरून व्हायरल केली जात आहेत.

माळुंगी नदीवरील पूल तुटल्या नंतर तो लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आणि या पुलावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल यासाठी संगमनेर कर नागरिक आग्रही आहेत. पूलाच्या पलीकडे शाळा, मंदिरे आणि नागरी वस्त्या आहेत. त्यामुळे या पुलावरून जाण्यासाठी नागरिकांना सोयीचा मार्ग मिळालेला होता. मात्र हा पूल तुटल्याने हा मार्ग बंद पडला.

तरी पालिकेने तातडीने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी पुलाच्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. मात्र हा मार्ग थोडासा लांबून पडतो अशी अडचण राजकीय पूढार्यांची झालेली आहे.
दरम्यान हा पूल लवकर दुरुस्त व्हावा यासाठी संगमनेरचे आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काय प्रयत्न केला असा सवाल करीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. नुकतेच दोन दिवसापूर्वी पूला जवळ जाऊन आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अनेक आरोप करण्यात आले.

हा फुल ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पडला असून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असाही सवाल उपस्थित केला गेला. तसेच आमदार थोरात यांनी यासाठी प्रयत्न केला नसल्याचा आरोप केला जात आहे.

त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये माळुंगी नदीच्या पुलाच्या कामाबाबत वक्तव्य केले. त्यांनी या पूलाच्या बांधकामाबाबत भाजपच्या नेत्यांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला.
नगरपालिकेच्या निवडणुकीत या विषयाचा इश्यू करता येईल असा भाजपचा प्रयत्न आहे आणि मंत्रालयात देखील भाजपच्या काही नेत्यांनी हा पूल होऊ नये म्हणून प्रयत्न चालविले असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले होते.

त्यानंतर महसूल मंत्री विखेंच्या गोटात खळबळ उडाली होती. विखेंच्या समर्थकांनी तातडीने विखे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध केले आणि त्या पत्राच्या माध्यमातून विखे यांनी या पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मागितला असल्याचे दाखवून दिले व थोरात यांवर आरोप केले.

या पत्राची तारीख आहे दि. २० एप्रिल २०२३ या पत्रावरून बातम्या आल्यानंतर सोशल मीडियात चर्चा सुरू असतानाच आमदार थोरात यांच्या समर्थकांनी पूल पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची प्रत सोशल मीडियावर प्रसिद्ध दिले आणि हे पत्र दि. ३० नोव्हेंबर २०२२ मध्येच दिले असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिले आहे.

त्यामुळे थोरात आणि विखे समर्थकांत सुरू असलेले ही पत्रो पत्री नेमके कोणाचे पितळ उघडे करीत आहे हे यातून दिसून आले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या पत्राची तारीख ही २० एप्रिल २०२३ असल्याने चार पाच दिवसांपूर्वी हे पत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे विखे पाटलांनी इतके दिवस कुठलेच प्रयत्न केले नसल्याचे या पत्रातून दिसून आल्याचा आरोप थोरात यांच्या कार्यकर्त्यांचा आहे.

तर याआधी स्थानिक आमदार बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी त्या पूला संदर्भात पाठपुरावा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पुलासाठी निधी मागितला असल्याचे थेट पत्राद्वारे दाखवून दिल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
माळुंगी पुलाच्या बांधकामासाठी कोणी किती प्रयत्न केले याचे पुरावे आणि कागदी घोडे नाचवत बसण्यापेक्षा हा पूर्ण लवकरात लवकर कसा होईल यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

