संसदेला टाळे आणि देश भांडवलदारांच्या हातात — संपादक खा. संजय राऊत
पत्रकारांना क्रांती करावी लागेल !

पत्रकारांसमोर असत्याच्या भिंती उभ्या आहेत. ज्यांनी बोललं पाहिजे त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. या देशात न्यायालये जनतेची राहिली नाहीत. ज्यांना उत्कृष्ट पत्रकारिता करायची आहे त्यांनी टिव्ही वरच्या बातम्या पाहणे बंद करावे. बोलण्यावर, लिहिण्यावर बंधनं येत आहेत. ही हुकुमशाही आहे. पत्रकारांना पत्रकारिता करु द्यावी, मालकांनी एजंटगीरी करु नये. ग्रामीण भागातील पत्रकार हे अन्याय विरोधात लढणारी फौज आहे. आजही माझी लेखणी माझे शस्त्र आहे. हव ते करुन दाखवण्याची ताकद वृत्तपत्रात आहे _ संजय राऊत

प्रतिनिधी —
‘देश भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे, आज न्यायालये जनतेचे राहिले नाहीत, ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत, संसदेला टाळे लागले आहे, प्रशासन हे गुलामासारखे पायरीवर बसलेले आहे. हे सर्व पाहता ‘समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे ते समाजापुढे मांडले पाहिजे. क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज अशाच पद्धतीने तेवत राहिला पाहिजे,’ असे मत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल असा घाणाघात त्यांनी राज्यसरकार केला.

नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, आणीबाणीचा काळ पाहिला त्यावेळेला एवढे कोणी गुलाम झाले नाही, तेवढे यांच्या कार्यकाळात आता गुलाम होऊ लागलेले आहेत. इंदिरा गांधी समोर कोणी झुकलो नाही, मात्र आता मालक सत्ताधाऱ्यांसमोर झुकत आहेत. आज एका व्यक्तीच्या भोवती वृत्तपत्रे फिरत आहेत. ही अत्यंत भयंकर बाब आहे. त्यामुळे आपली मान व शान जर टिकवायची असेल व पत्रकारांची लढवय्यी परंपरा पुढे न्यायची असेल, तर आपल्याला जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडले पाहिजे.

अजूनही मी पूर्णवेळ पत्रकार आहे, अजूनही मी अग्रलेख लिहितो. मला मधल्या काळात तुरुंगात टाकलं. मी जेलमधूनही अग्रलेख लिहित होतो. मी जरी राजकारणात असलो तरी लोकांनी मला पत्रकार म्हणूनच ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. दिल्लीत अजूनही मला सामना वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक म्हणूनच ओळखलं जातं. वृत्तपत्र क्षेत्र केवळ अडचणीत नाही तर वृत्तपत्र क्षेत्राच हवन सूरु आहे.

पूर्वीच्या काळात पत्रकारांची संख्या खूप कमी होती.पत्रकरांचे नेटवर्क आता गावपातळीपर्यंत पोहचले आहे, त्याचा वापर समाजासाठी व्हावा. ज्याचे हृदय जळतय तोच लिहू शकतो, सध्याची परिस्थिती पाहून त्याच हृदय जळतं त्याने स्वतःला पत्रकार समजावे. क्रांती रसाच्या चिळकांड्या कुठून उडू शकतील तर त्या लेखणीततूनच उडू शकतात. ९० टक्के मीडिया हा भांडवलदारांच्या ताब्यात आहे. या देशात न्यायालयं जनतेची राहिली नाहीत, न्यायालयात जनतेला न्याय मिळेल का याची शंका आहे. असे खासदार राऊत म्हणाले.

आज बोलण्यावर निर्बंध आहेत, लिहिण्यावर बंधनं आहेत. वृत्तपत्राचे संपादक, टीव्ही चॅनेलचे संपादक सर्व राजकीय नेते नेमतात. फक्त एका व्यक्तीच्या सेवेत पत्रकारिता रुजू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. ते संस्कार आमच्यावर झाले असल्याने आम्ही वाकायला आणि झुकायला तयार नाही. असे ते म्हणाले.

पत्रकार जनतेचे मत मांडू शकतो, ही वास्तवता आहे. समाज परिवर्तन करण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे. वर्तमानपत्रांमध्ये आजही काळ्याचे पांढरं होतं. याच्यावर सर्वांचा विश्वास आहे. तसा माझा पण आहे, म्हणून आज सुद्धा मी लिखाणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडत असतो. माझा लिहिण्यावर विश्वास आहे. म्हणूनच क्रांतीच्या ठिणग्या जशा लिखाणाच्या माध्यमातून घडल्या गेल्या. तशाच आता सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून घडविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकारांवर हल्ले होतात हे काही आजचे प्रकार नाहीत. ब्रिटिश काळापासून हे हल्ले होत आहेत. देशभरात आत्तापर्यंत बाराशे पत्रकारांना हल्ले झालेले आहेत. ही सुद्धा गंभीर बाब आहे. या हुकूमशाहीच्या पुढे मालक लोक सुद्धा काहीच बोलायला तयार नाहीत. उलट आता यांच्याच मांडीला मांडी लावून हे मालक लोक बसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांचे फावले गेले आहे. मग पत्रकारांनी आवाज उठवायचा कसा? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे,’ असेही ते म्हणाले.

पत्रकारांसमोर असत्याच्या भिंती उभ्या आहेत. ज्यांनी बोललं पाहिजे त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. या देशात न्यायालये जनतेची राहिली नाहीत. ज्यांना उत्कृष्ट पत्रकारिता करायची आहे त्यांनी टिव्ही वरच्या बातम्या पाहणे बंद करावे. बोलण्यावर, लिहिण्यावर बंधनं येत आहेत. ही हुकुमशाही आहे. पत्रकारांना पत्रकारिता करु द्यावी, मालकांनी एजंटगीरी करु नये. ग्रामीण भागातील पत्रकार हे अन्याय विरोधात लढणारी फौज आहे. आजही माझी लेखणी माझे शस्त्र आहे. हव ते करुन दाखवण्याची ताकद वृत्तपत्रात आहे, असेही संजय राऊत शेवटी सांगितले.

