‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी काँग्रेस बाबत आमदार थोरात यांची अवस्था….

नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या पराभवाबाबत मात्र मौन !

 

स्वतःला अपक्ष म्हणणारे आमदार सत्यजित तांबे यांना ‘तुम्हाला काँग्रेस शिवाय करमणार नाही आणि काँग्रेसलाही तुमच्याशिवाय करमणार नाही’ असे स्टेजवरच बाळासाहेब थोरात यांनी सांगून टाकले आहे. मात्र मामांच्या घरट्यात परतण्याची इच्छा तांबे यांची नसल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार थोरात यांच्यात झालेली ‘राजकीय सुंदोपसुंदी’ जनते समोर आली आहे. पक्षाकडे याबाबत तक्रारी झाल्या आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे कोणाला कोणापासून करमत नाही, हे लवकरच कळेल. मात्र सध्या तरी काँग्रेसमध्येच आमदार थोरात यांची ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी अवस्था झालेली आहे.

 

विशेष प्रतिनिधी —

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पराभवाबाबत कुठलेही वक्तव्य न करता आमदार बाळासाहेब थोरात एकीकडे याबाबत मौन बाळगून आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या विरोधात निवडून आलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना सोबत व्यासपीठावर घेतात. त्यांच्यासोबत मिरवणुका काढतात. त्यामुळे आमदार थोरात यांची भूमिका नेमकी कोणती हे आता लपून राहिलेले नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक निर्माते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे होते. महाविकास आघाडी तयार व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये ते महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळातील जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात होते.

असे असताना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पराभवाबद्दल थोरात यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. पाटील यांना मतदार संघात आमदार थोरात यांच्या कडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघात थोरात यांच्या यंत्रणेने सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणुकीत जोमाने काम केले असल्याचेच उघड झाले आहे.

आजारपणा नंतर आमदार बाळासाहेब थोरात संगमनेरला आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांची शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत फक्त आमदार सत्यजित तांबे हेच थोरात यांच्यासोबत मिरवणुकीच्या रथावर उभे होते. त्या मुळे ही मिरणूक दोघांचीही असल्याचे दिसले. ही मिरवणूक झाल्यानंतर व्यासपीठावर देखील तांबे हे थोरात यांच्याजवळ होते.

एकंदरीत सर्व प्रकार पाहता थोरात यांची या निवडणुकीत नेमकी भूमिका कोणती होती याबाबत मात्र संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली असताना थोरात यांच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतरच्या भूमिका व प्रत्यक्ष हालचाली पाहता आमदार थोरात यांनी आमदार सत्यजित तांबेंनाच मदत केली असल्याचे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया जाणकार मंडळी देत आहेत.

आमदार सत्यजित तांबे यांनीदेखील वेळोवेळी भाषणांमध्ये निवडणुकीसाठी जे जे आभार मानले त्या आभारामध्ये सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली. आमदार थोरात यांच्या सहकाऱ्यांची नावे घेण्यात आली. त्यामुळे आमदार थोरात आणि त्यांचे सहकारी नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीदरम्यान काय करत होते हे आता लपून राहिलेले नाही.

काही दिवसांपूर्वी विविध माध्यमांमधून आमदार थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या आल्या. याबाबतही थोरात यांनी कुठलाही खुलासा केला नाही. कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राजीनामा दिला आहे की नाही याबाबत देखील त्यांनी मौन बाळगले आहे.

स्वतःला अपक्ष म्हणणारे आमदार सत्यजित तांबे यांना ‘तुम्हाला काँग्रेस शिवाय करमणार नाही आणि काँग्रेसलाही तुमच्याशिवाय करमणार नाही’ असे स्टेजवरच बाळासाहेब थोरात यांनी सांगून टाकले आहे. मात्र मामांच्या घरट्यात परतण्याची इच्छा तांबे यांची नसल्याचे दिसते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार थोरात यांच्यात झालेली ‘राजकीय सुंदोपसुंदी’ जनते समोर आली आहे. पक्षाकडे याबाबत तक्रारी झाल्या आहेत. काँग्रेस नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे कोणाला कोणापासून करमत नाही, हे लवकरच कळेल. मात्र सध्या तरी काँग्रेसमध्येच आमदार थोरात यांचे ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी अवस्था झालेली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!