थोरात – तांबे कुटुंबामध्ये कलह होन्यासाठी अनेक अतृप्त आत्मे पाण्यात देव बुडवून बसले आहेत !

 

सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षातील नेते पळवायचे आहेत. त्यांना पळवणे जमले नाही तर त्यांना जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्यात येत आहेत. भीती दाखवली जात आहे. तेही जमले नाही तर त्यांचे घर फोडायचे आणि त्यांना आपल्या ‘दुकानात’ सामील करून घ्यायचे. असा डाव काही नेते करत आहेत. सर्वच पक्षांवर, विरोधी पक्षातील नेत्यांवर हा वरवंटा फिरवायचे काम सुरू आहे. सध्या तांबे – थोरात परिवार टार्गेट आहे. काय घडेल हे भविष्यात दिसेलच. तूर्तास तांबे – थोरात यांच्या परिवारात वितुष्ट आणण्यासाठी अनेक अतृप्त आत्मे देव पाण्यात बुडवून बसले असल्याची चर्चा आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी —

दुसऱ्याच्या घरात भांडण लावणे अथवा दुसऱ्याच्या घरातील भांडणे पाहण्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. त्यांचे चांगले चाललेले बऱ्याच जणांना पहावत नाही. राजकारणात तर अशा खोड्या करण्यात अनेक जण पटाईत असतात. अशा सराईत राजकारण्यांना राजकीय कुटुंब कलह खूप आवडत असतो. असा कलह घडवायचा आणि त्यातून राजकीय फायदा घ्यायचा. असे कुटुंब कलह घडवण्यासाठी त्या त्या राजकीय कुटुंबांच्या भोवती अनेक मंडळी कार्यरत असतात. तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या थोरात – तांबे परिवाराविषयी होत असल्याचे दिसून येत आहे. थोरात – तांबे परिवारात कुटुंब कलह व्हावा यासाठी अनेक अतृप्त आत्मे देव पाण्यात बुडवून बसले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

घरात जसे जावाजवांचे, सुना सासवांचे, ननंद भावजयचे, भावा भावांचे, चुलते पुतण्याचे भांडण असते, सूप्त कलह असतो. त्याचप्रमाणे राजकारणात असलेल्या मोठ्या कुटुंबीयांमध्ये देखील भांडणे असावीत किंवा त्यांचेही भांडणे व्हावीत यासाठी राजकारणातले नेते, पुढारी, नातेवाईक आणि सोयरे छुप्या पद्धतीने कार्यरत असतात. तर काही उघड पद्धतीने कार्यरत असतात. यातून आपल्याला राजकीय लाभ मिळावा अशी त्या मागची इच्छा असते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात विधानपरिषद निवडणुकीच्या कारणाने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे या कुटुंबात कलह कसा निर्माण होईल यासाठी आजूबाजूच्या आणि राज्यातल्या काही राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बरेच प्रयत्न केले असल्याचे दिसून आले आहे.

1985 सालाच्या आधीपासून आमदार बाळासाहेब थोरात हे राजकारणात सक्रिय आहेत. आजही विद्यमान आमदार आहेत. 1990 पासून आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे राजकारणात सक्रिय आहेत आणि आजही सक्रिय आहेत. तांबे यांच्या पत्नी सौ. दुर्गाताई या नगराध्यक्ष पदावर बरीच वर्षे विराजमान आहेत. सत्यजित तांबे युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात गेल्या बावीस वर्षांपासून काम करत आहेत.

तांबे आणि थोरात या कुटुंबीयांची संगमनेर तालुक्यावर निर्विवाद सत्ता आहे. संगमनेरच्या जनतेने त्यांना कायम भरभरून राजकीय आशीर्वाद दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था असो सहकार क्षेत्र असो किंवा विधानपरिषद आणि विधानसभा असो सर्वच क्षेत्रात तांबे थोरात परिवाराला संगमनेरच्या जनतेने एक दिलाने भरभरून पाठिंबा दिला आहे. या दोन्ही परिवारांचे एकत्रित राजकारण संगमनेरच्या जनतेला मान्य आहे. दोन्ही परिवारांनी एकत्रित केलेले राजकारण मात्र राज्यातील आणि विशेषत: काँग्रेस मधील काही नेत्यांना मान्य नसल्याचे दिसते.

विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेताच तांबे – थोरात यांचे स्व पक्षातील राजकीय विरोधक जोरात कामाला लागल्याचे दिसून आले. थोरात – तांबे यांच्या काही प्रतिक्रिया येण्याआधीच अनेक जण प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक झाले होते. तशा प्रतिक्रिया देखील माध्यमातून देण्यात आल्या. थोरात यांच्या पासून तांबे विलग होऊन दुसऱ्या पक्षात कसे जातील याचे खास प्रयत्न करण्यात आले. अद्याप तरी तांबे यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण तांबे आमचेच किंवा आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत, त्यांना असे करू, अमुक करू, तमुक करू अशा वल्गना आणि तांबेंवर डोळा असल्याचे माध्यमातून दिसून आले. नेमकी घाई कोणाला झाली होती हे या परिस्थितीत दिसून येते.

सोशल मीडियातून देखील थोरात आणि तांबे परिवारात वितुष्ट निर्माण होईल अशा विविध पोस्ट व्हायरल झालेल्या अनेकांनी पाहिल्या. माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे बडे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे पक्षातील काही विरोधक नेते कार्यरत झाले होते. थोरात यांच्या नगर जिल्ह्यातील काही विरोधक नेत्यांना हाताशी धरून या नेत्यांनी राजकीय कुरघोड्या केल्या असल्याचे बोलले जात आहे. एकमेकांशी संधान साधून काँग्रेस पक्षातच थोरात यांना आरक्षण निर्माण करता येईल अशी चाल खेळण्यात आली आहे. आणि या राजकीय कुर घोड्या चालू असताना थोरात यांचे उजवे हात आमदार डॉक्टर तांबे यांचा संपूर्ण परिवारात थोरात यांच्या पासून कसा तोडता येईल याचे देखील प्रयत्न सुरू झाले. आजही ते प्रयत्न सुरू आहेत. परंतु अद्याप पर्यंत तांबे पिता-पुत्र या अशा कृत्य करणाऱ्या मंडळींच्या गळाला लागलेले दिसत नाहीत.मात्र भविष्य काय आहे हे सांगता येणार नाही.

सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षातील नेते पळवायचे आहेत. त्यांना पळवणे जमले नाही तर त्यांना जेलमध्ये टाकायच्या धमक्या देण्यात येत आहेत. भीती दाखवली जात आहे. तेही जमले नाही तर त्यांचे घर फोडायचे आणि त्यांना आपल्या ‘दुकानात’ सामील करून घ्यायचे. असा डाव काही नेते करत आहेत. सर्वच पक्षांवर, विरोधी पक्षातील नेत्यांवर हा वरवंटा फिरवायचे काम सुरू आहे. सध्या तांबे – थोरात परिवार टार्गेट आहे. काय घडेल हे भविष्यात दिसेलच. तूर्तास तांबे – थोरात यांच्या परिवारात वितुष्ट आणण्यासाठी अनेक अतृप्त आत्मे देव पाण्यात बुडवून बसले असल्याची चर्चा आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!