काँग्रेस – राष्ट्रवादीमय भाजप !

नगर जिल्हा भाजपवर काँग्रेस – राष्ट्रवादीचे वर्चस्व !

 

विखे – थोरात – तांबे यांची सत्तेची नाळ जुळलेली आहे. अनेक वर्षांपासून ही मंडळी सत्तेत आहे. आणि ज्यांची सत्तेशी नाळ जुळलेली आहे, ती नाळ कधीच तुटत नाही. त्यामुळे विखे – थोरात – तांबे यांनी आपापसात कितीही वाद, भांडणे असल्याचे चित्र माध्यमांमधून निर्माण केले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते. आणि ती नेहमी उघड होत असते. शेवटी वतनदारी सर्वांना प्रिय असते. पण त्यावरून भांडणाऱ्या विखे, थोरात आणि तांबे यांच्या समर्थकांना आणि मतदारांना ही भानगड जेव्हा समजेल तो लोकशाहीसाठी सुदिन म्हणावा लागेल.

 

 

विशेष प्रतिनिधी —

काँग्रेस मुक्त भारत करायच्या नादात निष्ठावान कार्यकर्ते मुक्त काँग्रेस – राष्ट्रवादीमय भाजप असा प्रकार ग्रामीण भागात सुरू झाला आहे. नगर जिल्ह्याने त्यात आघाडी घेतली असून पूर्वाश्रमीचे काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाचे नेते हे भाजपचे नेते म्हणून सध्या मिरवत असल्याने मूळ भाजप संपुष्टात आल्याचे चित्र नगर जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.

भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये ह्या अशा राजकीय खेळांमुळे अस्वस्थता पसरली असून भाजप नेमका कोणत्या दिशेने जात आहे ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या सुरू असलेल्या नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकी साठी भाजपवाले काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या मागे मागे पळताना दिसत आहेत. तांबेंना भाजपमध्ये घेऊन भाजपवाले भाजपचेच काय काय वाटोळे करणार आहे हे येणाऱ्या काळात दिसेलच.

नगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद यापूर्वी स्वतःची ताकद म्हणून ओळखली जात होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते थेट लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि उमेदवार निवडून येत होते. विविध ठिकाणी शह देत होते. संघर्ष करत होते. यामध्ये भाजपबरोबर निष्ठावान पणे काम करून आपले आयुष्य वेचणारे अनेक कार्यकर्ते पुढारी छोटे-मोठे नेते सामावलेले आहेत. स्वर्गीय सूर्यभान वहाडणे, सुदामराव सानप, भगवान गीते, प्राध्यापक एस झेड देशमुख, जालिंदर वाकचौरे, ज्ञानेश्वर कर्पे, सिताराम भांगरे, राजाभाऊ झरकर, प्रभाकर दसरे, स्वर्गीय दिलीप गांधी यांच्यासह अनेक कष्टाळू प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भाजप वाढवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत.

मात्र काही वर्षांपासून तशी परिस्थिती आता राहिलेली नसून निष्ठावान कार्यकर्ते बाजूला सारून काँग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देत काँग्रेस – राष्ट्रवादी युक्त भाजप असा प्रकार राजकीय परिक्षेत्रात पाहण्यास मिळत आहे.

नगर जिल्ह्यात ही सुरुवात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करते झाले. त्याआधी बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजप प्रवेश केला होता आणि आमदारकीही मिळवली होती. बबनराव पाचपुते व राजळे सध्या विद्यमान आमदार आहेत. मात्र कोल्हे, कर्डिले यांना आपली आमदारकी गमवावी लागली आहे.

एकंदरीत पाहता भाजपला नगर जिल्ह्यात चांगल्या प्रकारे यश मिळत असताना, सत्तेत सहभाग मिळत असताना काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात घेऊन पक्षाने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे काय अशी चर्चा मतदारसंघ जिल्ह्यात सुरू असते.

विधान परिषदेवर असलेले आमदार राम शिंदे यांना विधानसभेत पराभूत व्हावे लागले. कर्डिले यांना पराभूत व्हावे लागले. वैभव पिचड यांना पराभूत व्हावे लागले. कोल्हे यांना पराभूत व्हावे लागले. राम शिंदे वगळता ही सर्व मंडळी पूर्वाश्रमीची काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षाची आहे. त्यामुळे भाजपचे नेमके कोण हा प्रश्न उद्भवतो.

नवीन नेते मंडळी भाजपात आल्यानंतर भाजपचा असा कोणता फायदा झाला हा नगर जिल्ह्यात संशोधनाचा विषय आहे. भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांचा संयम मात्र कुठे चालल्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपची खरी ताकद ही नेत्यांमध्ये नसून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे, हे सर्वश्रुत आहे. हेच निष्ठावान कार्यकर्ते बाजूला झाले तर ?

नगर दक्षिण जिल्ह्यात भाजपला यावेळी मोठी अडचण निर्माण होणार आहे. विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकात त्याचा परिणाम पाहायला मिळेल असे मत जाणकार मंडळी व्यक्त करतात. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना अधिक परिश्रम घ्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर विधानसभेला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

उत्तर नगर जिल्ह्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता इतर उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. नगर उत्तर मध्ये चांगले उमेदवार मिळवण्यासाठी भाजपला मोठी धडपड करावी लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी मधून आलेल्या मागील नेत्यांना उमेदवारी दिल्यास भाजपला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. अशी शक्यता भाजपचेच कार्यकर्ते बोलून दाखवतात.

सध्या उत्तर नगर जिल्ह्यामधील अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे कार्यरत आहेत. तर संगमनेर मध्ये आमदार बाळासाहेब थोरात (काँग्रेस), कोपरगाव मध्ये आशुतोष काळे (राष्ट्रवादी), शिर्डी मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), पारनेर मध्ये आमदार निलेश लंके (राष्ट्रवादी), श्रीरामपूर मध्ये आमदार लहू कानडे (काँग्रेस)

नगर दक्षिण मधील नगर शहरा मध्ये आमदार संग्राम जगताप (राष्ट्रवादी), कर्जत – जामखेड मध्ये आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी), श्रीगोंदा मध्ये आमदार बबनराव पाचपुते (भाजप), पाथर्डी मध्ये आमदार मोनिका राजळे (भाजप), राहुरी मध्ये प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), शेवगाव मध्ये आमदार शंकरराव गडाख (शिवसेना)

अशी एकंदरीत परिस्थिती आहे. या सर्व आमदारांपैकी फक्त तीन आमदार भाजपचे आहेत. ते देखील पूर्वाश्रमीचे काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षामधून आलेले आहेत. त्यामुळे भाजपचे स्वतःचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. काही झाले तरी नगर जिल्ह्यातील सत्ता ही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात राहते. विशेषतः सहकार सम्राटांच्या ताब्यात राहते असे चित्र पाहण्यास मिळत आहे.

पूर्वाश्रमीच्या काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षात असणाऱ्या नेत्यांनी भाजपमध्ये येऊन स्वतःची पदे टिकवली. मात्र त्याचा भाजपला काय फायदा झाला ? भाजपने यातून काय मिळवले ? अकोले तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर किरण लहामटे यांना भाजपची उमेदवारी मिळाली असती तर आज त्या ठिकाणी भाजपचा आमदार असता. परंतु भाजपचे वरिष्ठ नेते पिचड यांना भाजपात घेऊन मोकळे झाले. आणि तिथली जागा सहजरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली.

आता अकोल्यात भाजपचा आमदार होण्याची शक्यता फार कमी आहे. उलट भाजपच्या स्वतःच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही पाच-सहा जागा आहेत त्या जागा सुद्धा जाण्याचा धोका यावेळी निर्माण झाला आहे. बाकी संपूर्ण नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचेच वर्चस्व दिसून येत आहे. निवडणुकीनंतर देखील हीच परिस्थिती राहणार असल्याची चिन्हे आहेत.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत डॉक्टर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांची बंडखोरी आणि भाजप मध्ये जाण्याची चर्चा यामुळे संगमनेर तालुक्यातील भाजपचे पारंपरिक सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत. त्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटू लागल्या आहेत. आयुष्यभर संघर्ष करून ज्यांना विरोध केला त्यांना डोक्यावर घेऊन मिरवायचे का असा सवाल करीत आता फक्त मळक्या सतरंज्या उचलण्याचे काम भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राहिले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत. सध्या भाजपचे ३ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे ९ आमदार आहेत. हे चित्र पाहता पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपची नेमकी काय अवस्था असेल याचा अंदाज येतो.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!