गुन्हेगारांनी संगमनेर पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली !

खून, हाणामाऱ्या, दरोडे, घरफोडी, चोऱ्या यामुळे जनता त्रस्त !

पालक मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज !

 

पालक मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज !

राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास या खात्याचे ते मंत्री आहेत. मंत्री झाल्यापासून त्यांनी नगर जिल्ह्यातील आणि विशेषत: संगमनेर, पारनेर मधील वाळू तस्करी मोडीत काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या धडक कृतीमुळे तालुक्यातील वाळूमाफियांना जबरदस्त हादरा बसला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले. गौण खनिज तस्कर कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडले. हे सर्व होत असताना पोलीस विभागाकडे मात्र दुर्लक्ष झाले. संपूर्ण नगर जिल्ह्यातच पोलीस यंत्रणे कडे पालकमंत्र्यांकडून दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. संगमनेर तालुक्यात राजकीय वादातून दोन गंभीर घटना घडल्या. अगदी पिस्तूल काढून धमकावण्यात आले. हाणामाऱ्या झाल्या, बेदम मारहाण झाली. तेथील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विषयी तक्रारी आहेत. यामागे पोलिसांच्या नेमक्या भूमिका काय आहेत ? गुन्हेगारीवर नियंत्रण का येत नाही ? दरोडे, चोरी याच सातत्याने वाढ का होत आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज असून पोलीस यंत्रणेला याबाबत जाब कोण विचारणार ? संगमनेर शहरा सारख्या संवेदनशील ठिकाणी चांगल्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी फक्त वाळू माफियांवर लक्ष केंद्रित न करता पोलीस आणि वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी यांच्यावर देखील लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

विशेष प्रतिनिधी —

 

संगमनेर शहरासह तालुक्यात आणि ग्रामीण भागात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. खून, दरोडे, हाणामाऱ्या, चोऱ्या, घरफोडी अशा गंभीर घटनांमधून गुन्हेगारांनी संगमनेर पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आहे. संगमनेरात झालेला या गुन्ह्यांचा तपास अद्याप पोलिसांना लावता आलेला नाही. एकही दरोडेखोर, चोर, गुन्हेगार पोलिसांना पकडता आलेला नाही. त्यामुळे पोलीस नेमके करतात काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ

संगमनेर शहरासह संपूर्ण संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असून या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते. संगमनेर शहरात सुमारे दोन महिन्या पूर्वी एक खुनाचे प्रकरण घडले आहे. या गुढ खुनाची अद्याप पर्यंत कुठलीही उकल पोलिसांना करता आलेली नाही. यामधील तपास सुद्धा प्रगतीपथावर नसल्याची चिन्हे आहेत.

शहराच्या आजूबाजूच्या उपनगरात दरोडे, चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू होते. महिनाभरापूर्वी सुकेवाडी शिवारात दरोडा घालण्यात आला होता. एकाच वेळी चार-पाच घरांमध्ये घुसून दरोडेखोरांनी ऐवज लंपास केला होता. या घटना ताज्याच आहेत. घरफोड्या तर सातत्याने सुरू आहेत. मोटर सायकल चोरी नेहमीची झाली आहे.

असे असताना प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरात भरवस्तीत दरोडा टाकण्यात आला. याची साधी भनक देखील पोलिसांना लागली नाही. एकंदरीत पाहता संगमनेर पोलिसांचे वाभाडे या सर्व घटनांमुळे निघालेले आहेत.

तालुक्यातील आश्वी, घारगाव आणि संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. यामध्ये देखील मोटरसायकल चोरी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी, ट्रॅक्टर सारख्या वाहनांच्या चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील वीज पंपांची चोरी एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची पिके, जनावरे अगदी शेळ्या मेंढ्या देखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याचे प्रमाण वाढतच आहे.

अवैध उद्योगांची मात्र चलती

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी होत असले तरी संगमनेर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांची चलती मात्र जोरात आहे. ग्रामीण भागासह सर्वत्र जुगार अड्डे, मटका, अवैध प्रवासी वाहतूक, गांजा तस्करी, कत्तलखाने, वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पोलिसांचे या धंद्यावाल्यांशी असलेले हितसंबंध याबाबत नेहमीच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असते. या सर्व धंद्यांना आशीर्वाद कोणाचे आहेत हे सर्वश्रुत आहे. गुन्हेगारी वाढत असली तर दुसरीकडे अवैध धंद्यांची चलती हे नेमके कशाचे द्योतक आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

माहिती लपवण्यात पोलीस पटाईत !

संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांमधून माध्यमांना माहिती देण्यात लपवाछपवी केली जात असल्याचे अनुभव नेहमीच पत्रकारांना आलेले आहेत. महत्त्वाच्या घटना, दाखल झालेले गुन्हे माध्यमांपासून लपवून ठेवण्यात पोलीस चांगलेच पटाईत झाले आहेत. गुन्ह्यांची अर्धवट माहिती देणे, तपास चालू आहे. असे मोघम उत्तरे देणे, आरोपींना पकडल्यानंतर त्यांची नावे न सांगणे अशा विविध कारणांमुळे पोलीस दाखल गुन्ह्यांची माहिती दडपण्यात आणि लपवण्यात नेमके कोणाचे भले करीत आहेत असा संशय व्यक्त होतो. आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय काय उद्योग चालू आहेत हे समाजाला समजू नये यासाठी दाबादाबी करण्याचा प्रयत्न प्रत्येक पोलीस ठाण्यातून होत असल्याचे दिसून आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!