संगमनेरच्या शांततेचा बळी !

पोलिसांनी पडद्या मागच्या सूत्रधारांचा शोध घेण्याची गरज…

विशेष प्रतिनिधी —

महाराष्ट्रात हिंदूंवर होणारे वेगवेगळे अत्याचार, लव्ह जिहाद, अवैध गोवंश कत्तलखाने, संगमनेरातील जोर्वे नाक्यावर मुस्लिम टोळक्या कडून ग्रामीण भागातील हिंदू तरुणांना झालेली जीवघेणी मारहाण या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेरात भगवा निषेध मोर्चा काढण्यात आला.

आयोजकांनी मोर्चा शहरात शांततेत पार पाडला…

विविध अटी लादलेल्या या मोर्चाचे आयोजन व्यवस्थितपणे करण्यात आले होते. सकाळी मोर्चा सुरू होऊन तो प्रांत अधिकारी कार्यालयावर येईपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मोर्चामध्ये महिला तरुणी सहभागी होत्या. घोषणा दिल्या जात होत्या. संपूर्ण मोर्चा सभा स्थानी येईपर्यंत शांततेत पार पडला होता. आयोजकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

मात्र मोर्चा आधी आणि नंतर…

मोर्चा संपल्यानंतर आणि मोर्चा सुरू होण्याच्या आधी घडलेल्या काही घटनांमुळे संगमनेरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चा सुरू होण्याआधी दिल्ली नाका तीन बत्ती चौक या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीचे दुकान सुरू असल्याचे पाहून भगव्या टोप्या आणि उपरणे घातलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या दुकानात घुसून तोडफोड केली. बळजबरीने त्यास दुकान बंद करण्यास भाग पाडले.

समनापुरची घटना पोलीस निरीक्षकांसमोर..

मोर्चा संपल्यानंतर गावाकडे परत जात असताना समनापुर या गावात मोर्चेकरी युवकांनी घोषणा दिल्या त्या घोषणांना प्रति घोषणांचे उत्तर मिळाल्याचे पाहून संतप्त तरुणांनी दगडफेक सुरू केली आणि त्यातून हिंदू मुस्लिमांचे दोन गट समोरासमोर आले आणि भगव्या मोर्चाला हिंसक कृत्यांचे गालबोट लागले असल्याचे सांगितले जाते. मात्र समनापुर मधील घटना ही बंदोबस्तासाठी असलेल्या एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलिसांसमोर घडली आहे. घटना घडत असताना त्या पोलीस निरीक्षक साहेबांनी नेमकी काय कामगिरी केली हे सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.

सायंकाळी संगमनेर शहरात डॉक्टर इथापे यांच्या हॉस्पिटल समोर देखील हिंदू-मुस्लीम तरुणांमध्ये गोंधळ झाला. मारहाण झाली. त्या प्रकरणी काही मुस्लिम तरुणांना पोलिसांनी पकडून नेले आहे. यावेळी देखील पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. येथे पण छोटीशी दगडफेक झाल्याचे समजते. पोलिसांकडून कारवाईच्या संदर्भात आणि गुन्हे यांच्या संदर्भात सध्यातरी माहिती दिली जात नाही.

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला संगमनेर मध्ये ठाण मांडून असल्याने घटनेच्या ठिकाणी ते स्वतः पोहोचले. त्यांच्याबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. छोट्या हिंसक घटनांना मोठे स्वरूप न येता सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांनी चोख पणे बजावले. कुठल्याही छोट्या घटनेचे रूपांतर मोठ्या घटनेत होऊ दिले नाही. त्यासाठी पोलिसांनी अतिशय सतर्क राहून वेळोवेळी केलेले कारवाई कारणीभूत ठरली आहे.

त्यानंतर रात्री पोलिसांनी घडलेल्या घटनांच्या संदर्भात धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही समाजाकडून पोलिसांशी वादावादी झाली. मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरूच ठेवली. कुठल्याही घटनेत सहभागी नसलेले तरुण पोलिसांनी विनाकारण पकडून नेले आहेत. असे पोलीस ठाण्याच्या आवारात आणि परिसरात आलेले दोन्हीकडचे लोक सांगत होते. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्रीतून दोन्हीकडच्या संशयीतांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे.

जोर्वे नाक्यावर झालेल्या मारहाणीच्या घटने नंतर कोणत्या बड्या राजकीय नेत्याने हस्तक्षेप करीत विविध कारवाया करण्यास पोलीस आणि प्रशासनाला भाग पाडले हे सर्व संगमनेरकर जाणून आहेत. त्यानंतर लगेचच निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. संगमनेर बजरंग दलाने यात पुढाकार घेतला. विश्व हिंदू परिषदेचे नेते संगमनेरात भाषणासाठी आले. सकल हिंदू समाज असे नाव जरी दिले होते तरी बजरंग दल आणि एका बड्या राजकीय नेत्याचे पाठबळ मोर्चाला लाभले होते असे आता बोलले जात आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांचा संशय…

संगमनेरचे आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भगवा मोर्चाच्या संदर्भाने एक पत्र काढून जनतेला विनम्र आवाहन केले होते. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर मध्ये असलेले विकासाचे आणि बंधू भावाचे वातावरण कौतुकास्पद आहे. आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून संगमनेरला अस्थीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे नाकारता येणार नाही. याच घटकांकडून जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे. मात्र यामागे दडलेला त्यांचा राजकीय हेतू आपणासही ठाऊक आहे.

आमदार थोरात यांनी या मोर्चाच्या मागे कोणाचा तरी राजकीय हेतू दडला असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यामुळे या मोर्चाच्या मागे राजकारण होते की काय ? याचाही तपास होणे आवश्यक आहे.

दंगलींमध्ये वेळोवेळी होरपळून निघालेल्या संगमनेरला दंगलींचा इतिहास आहे. हा इतिहास पुसून टाकण्याचे काम अनेक वर्षांपासून दोन्ही समाजाच्या नेत्यांनी आणि नागरिकांनी केले आहे. बऱ्याच वर्षांपासून संगमनेरात हिंदू मुस्लिम शांतता नांदत होती. किरकोळ घटना वगळता कोणीही मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र आता या घटनांनंतर ‘संगमनेरच्या शांततेचा बळी’ गेला असल्याचे दिसून येत आहे. हा शांततेचा बळी घेण्यासाठी दोन्ही समाजातील कट्टर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. आणि त्यास राजकीय पाठबळ तर मिळत नाही ना ? याचा शोध घेणे आवश्यक आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!