सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांचे काम थांबले — आमदार थोरात
प्रतिनिधी —
महाविकास आघाडी सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू ठेवले. परंतु सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे. कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्यातील सहकारी संस्था, कारखाना यामुळे तालुक्यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याने यावर्षी अनेक अडचणीवर मात करून १० लाख मेट्रिक टन यशस्वी गाळप केले आहे. मात्र कार्यक्षेत्रात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढेल यासाठी काम केले पाहिजे.

निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून आपण पूर्ण केले. असून कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस कामे सुरू ठेवली होती. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी द्यायचे होते. परंतु सरकार बदलले आणि काम मंदावले. परंतु पाणी येणार आहे.शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

सहकारी संस्थांमुळे तालुक्यात समृद्धी आली असून वैभवशाली व प्रगतशील तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा नंबर हा राज्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये लागतो.
सुसंस्कृत व बंधू भावाचे राजकारण ,ज्येष्ठांचा सन्मान हे आपल्या तालुक्याची परंपरा असून सर्वांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. संगमनेरचा सहकार, शिक्षण संस्था, व्यापार, शेती हे अत्यंत चांगले असून या चांगल्या कामाचा अभिमान बाळगताना सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे पार पाडला आहे. यामध्ये कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. सहकारातूनच समाजाचे हित होत असल्याने सहकार चळवळ प्रत्येकाने जपली पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार , मिनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, मंदा वाघ, रामदास वाघ, संभाजी वाकचौरे, मीरा शेटे, सुधाकर जोशी, सुधाकर रोहम, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हाईस चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

