तानसा धरणातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना सुरक्षा किट पुरवावेत — आमदार सत्यजित तांबे

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी पाड्यातील कुटुंबांना, शालेय विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या तराफ्यावरून शालेय शिक्षण घेण्यासाठी आणि जीवनावश्यक कामांसाठी धोकादायक प्रवास करावा लागतो. या सर्वांना निदान सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा आणि त्यांना सुरक्षा किट देण्यात यावेत असे पत्र विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

शहापूर तालुक्यातील तानसा धरण पाणलोट क्षेत्राच्या आसपासच्या ७ आदिवासी पाड्यांमधील २०० कुटुंबांना हॉस्पिटल, शाळा, व इतर सुविधांसाठी अत्यंत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील लोक असुरक्षित अशा प्लास्टिकच्या पाईपच्या तराफ्यातून, जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पर्यायी मार्ग नसल्यामुळे येथील सावरदेव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालकांना रोज हा संघर्ष करावा लागणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

तरी या प्रवाश्यांसाठी तातडीने सुरक्षा किटची व्यवस्था करावी. तसेच, त्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी. असे आमदार तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेले अनेक आदिवासी पाडे आजही मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहेत. बोरालेपाडातले विद्यार्थी बोटीतून जीवघेणा प्रवास करत सावरदेवच्या शाळेत पोहचतात. पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे असं शिक्षण हक्क कायदा सांगतो. परंतु प्रत्यक्षात असे अनेक आदिवासी विद्यार्थी आजही शिक्षणासाठी संघर्ष करीत आहेत.

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!