सत्यजित तांबे यांना भाजपची ‘रसद’ मिळण्याची शक्यता कमी !
आमदार थोरात यांचे मौन ! महसूल मंत्री विखे पाटील यांचा गट शांत !!
प्रतिनिधी —
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरू आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील अशी प्रमुख लढत होत असल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात दिसून येत आहे. निवडणुकीआधी मी भाजपकडून पाठिंबा घेईल, भाजपकडे पाठिंबा मागण्यासाठी जाईल असे सत्यजित तांबे यांनी सांगितले होते. निवडणुकीचा प्रचार मध्यावर आलेला आहे. अद्याप भाजप आणि भाजपचे कार्यकर्ते या निवडणुकीत तांबेंसाठी सक्रिय झालेले दिसत नाहीत किंवा इतर कोणत्याही उमेदवारासाठी सक्रिय झालेले दिसत नाहीत. भाजपची भूमिका गुलदस्त्यात असल्याने सत्यजित तांबे यांना भाजपकडून निवडणुकीसाठी सक्रिय ‘रसद’ मिळणार नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून नाशिक मतदार संघातल्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासूनच हा पदवीधर मतदारसंघ चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांच्या विषयी ‘गोड गोड बोला’ अशी भूमिका घेतलेली आहे. तांबे – थोरात यांचे पारंपारिक विरोधक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मवाळ भूमिका घेत ‘पक्षाचा जर आदेश आला तर सत्यजित तांबेंना निवडणुकीत मदत करू’ अशी भूमिका घेतली होती.

एकंदरीत तांबे यांना भाजपकडून निवडणुकीत सहकार्य होईल अशी परिस्थिती दिसत होती. मात्र प्रत्यक्ष निवडणूक सुरू होऊन प्रचार सुद्धा निवडणुकीच्या मध्यात आलेला असताना भाजपच्या गोटात शांतता आहे. त्यामुळे तांबे यांना भाजप मदत करेलच असे दिसत नाही.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केले असले तरी नगर जिल्ह्यातील काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआयचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघातले पदाधिकारी हे सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीत उघडपणे प्रचार करताना दिसून येत आहेत. त्यामुळे काँग्रेसचीही भूमिका नेमकी संशयास्पद असल्याचे बोलले जाते.

आमदार बाळासाहेब थोरात यांची चुप्पी !
आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरणे, सत्यजित तांबे यांची बंडखोरी या सर्व प्रकरणावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जी चुप्पी धरली आहे ती अजून तशीच आहे. आमदार थोरात यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आणि सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यापासून बाळासाहेब थोरात मौनात गेले आहेत. हे मौन आणखी किती दिवस चालेल हे थोरात यांनाच माहित आहे. असेही म्हणतात की, आमदार थोरात यांनी जर जास्त मौन बाळगले तर ते समोरच्यांना धोकादायक असते. आता हा धोका कोणाला होईल हे निवडणुकीनंतर दिसून येईल. मात्र याबाबत थोरात यांनी कुठलाही खुलासा केला नाही. काँग्रेसही थोरात यांच्या बाबत कुठलीही भूमिका घेत नाही. त्यामुळे नेमके काय शिजत आहे. हे आमदार थोरात, काँग्रेस पक्ष आणि तांबे पिता पुत्रांनाच माहीत असावे.

विखे गट शांत!
पदवीधर मतदारसंघासाठी नगर जिल्ह्यातले मतदार महत्त्वाचे ठरणार आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगर जिल्ह्यातील राजकारणात मोठे प्रस्थ आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. शिवाय भाजप पक्षही त्यांच्या सोबत आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सक्रिय कार्यरत आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांना विखे पाटलांकडून मदत मिळते की नाही हा एक चर्चेचा विषय झालेला आहे. मात्र जिल्ह्यात विखे यांचा गट पूर्णपणे शांत असून विखे गटाकडून कुठल्या हालचाली दिसून येत नाहीत आणि प्रतिक्रिया देखील येत नाहीत.

अद्याप पक्षाचे आदेश नाहीत – ॲड. गणपुले
पक्षादेश नसल्यामुळे आम्ही प्रचारात सक्रिय आणि निवडणुकीत सक्रिय नसल्याचे भाजपचे संगमनेर शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी सांगितले. ‘संगमनेर टाइम्सशी’ बोलताना ते म्हणाले की, फॉर्म भरल्यानंतर मी सर्वच पक्षांचा पाठिंबा घेणार आहे. भाजपकडे सुद्धा पाठिंबा मागण्यासाठी जाणार आहे. असे एक उमेदवार म्हणत होते. मात्र अद्यापर्यंत प्रत्यक्षात पक्षाकडे निवडणुकीसाठी पाठिंबा द्या, मदत करा अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केलेली नाही. तसे केल्याचे दिसून येत नाही. फक्त मीडियातूनच असे भाषण करण्यात आलेले आहे. निवडणूक ही पाच जिल्ह्यांशी संबंधित आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही कृती करणार आहोत. अद्याप पर्यंत आम्हाला पक्षाकडून कोणतेही आदेश आलेले नसल्याने आम्ही या निवडणुकीत सक्रिय नाही. असे देखील गणपुले यांनी सांगितले.

एकंदरीत पाहता सुरुवातीला सत्यजित तांबे यांनी विविध पक्षांचा पाठिंबा मिळवणार असल्याचे सांगत स्वतः फुगवलेला फुगा अद्याप हवेत तरंगत आहे. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलेला नाही. काही “शिक्षक कंपन्यांनी” मात्र सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. दोन्हीकडून प्रचाराची पहिली फेरी संपत आलेली आहे. पुढच्या चार-पाच दिवसात प्रचार शिगेला पोहोचणार आहे. भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. नगर जिल्ह्यात महसूल मंत्री विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आणि पदवीधर मतदारसंघात नाशिक शहर व नाशिक ग्रामीण मधील पदवीधर मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सध्या तरी रंगत आलेली दिसून येत आहे.

