संगमनेर तालुक्यावर सूड उगवण्याचे काम चालू आहे — आमदार थोरात
काँग्रेस हाच आमचा विचार आणि कॉंग्रेस हाच आमचा पक्ष…
प्रतिनिधी —
मधल्या काळामध्ये खूप राजकारण झाले. सत्ता बदल झाल्यानंतर तालुक्यावर सूड उगवावा असे हल्ले होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांचे उद्योगधंदे बंद पाडले जात असून अनेकांना अडचणीत आणले जात आहे. तालुक्यातील विकास कामे बंद पाडली जात आहेत. सत्ता बदलानंतर सुरू झालेले हे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु संघर्ष हा संगमनेर तालुक्याने कायम केलेला आहे. आपण संघर्षातूनच मोठे झालो आहोत. निळवंडे धरणासाठीचा संघर्ष, पाणी वाटपाबाबतचा संघर्ष अशा विविध संघर्षांमधून तालुक्याची वाटचाल झाली आहे. या संघर्षातूनही आपण नक्कीच पुढे जाऊ. असा विश्वास माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने जाणता राजा मैदानावर शिंदे शाही बाणा या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन पद्धतीने तालुक्यातील जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजप पर्यंत नेऊन पोहोचवले. हे अत्यंत दुर्दैवी असून काँग्रेसच्या विचारावरच आपली वाटचाल झाली असून या पुढील काळातही याच विचारांवर वाटचाल सुरू राहणार आहे असे स्पष्ट सांगताना मागील महिन्यात झालेले राजकारण व्यतीथ करणारे असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले की, २६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या अपघातामुळे खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्यामुळे संगमनेरला येता आले नाही. एक महिनाभर तालुक्यातील जनतेपासून दूर असा जीवनात कोणताच कालखंड नव्हता. संगमनेर तालुका हे आपली कुटुंब असून दर चार दिवस, आठ दिवसातून तालुक्यातील जनतेमध्ये येत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. विकास कामांमध्ये सहभाग घेत असतो. याचबरोबर संस्थांच्या बैठका घेत असतो. कुटुंबाप्रमाणे तालुक्याचे आपण काळजी घेत असून आतापर्यंत ही वाटचाल यशस्वी झाली आहे.

विकासाच्या वाटचालीमध्ये संगमनेर तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात चांगला तालुका म्हणून ओळखला जातो. येथील सुसंस्कृत राजकारण, शांतता सुव्यवस्था, प्रगती यामुळे राज्यातील वरच्या क्रमांकावर असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होत असतो.

मागील महिन्यात झालेले राजकारण हे व्यतिथ करणारे आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविलेल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोलले पाहिजे या मताचा मी नाही. पक्ष पातळीवर आणि माझ्या पातळीवर आपण योग्य करू. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. काहींनी भाजपापर्यंत नेऊन पोहोचवले एवढेच नाही तर भाजपाचे तिकीट वाटप सुद्धा केले. काही लोक जनतेमध्ये गैरसमज पसरत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. असे असले तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आतापर्यंत याच विचारांवर वाटचाल सुरू होती. यापुढेही काँग्रेसच्या विचारांवर वाटचाल सुरू राहणार असल्याची ग्वाही आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून यापुढील काळातही जनतेने आपल्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन केले आहे.

सत्यजित तांबे यांचे अभिनंदन
नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्याने विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले युवा आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

