सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार !

प्रतिनिधी —

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ संगमनेर शहर व नगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या विविध घडामोडीनंतर सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करीत काँग्रेस विरुद्ध उमेदवारी दाखल करून पक्षाला आव्हान दिले होते. त्यानंतर मतदार संघाचे अधिकृत विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर सत्यजित तांबे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर आज संगमनेर मध्ये सत्यजित तांबे यांनी प्रचाराची सुरुवात केली.

शहरातील विविध देवस्थानांमध्ये दर्शन घेऊन, आरती करून, चादर चढवून तांबे यांनी प्रचाराची सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या समवेत युवक काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. शहरातील सप्तशृंगी, रेणुका माता मंदिर, अरगडे गल्लीतील हनुमान मंदिर, शमी गणपती या ठिकाणी देवदर्शन घेत सय्यद बाबा चौकातील सय्यद बाबांच्या दर्ग्यावर सादर चढवीत उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात सुरुवात केली आहे.

काँग्रेसने तांबे पिता पुत्रांना पक्षातून निलंबित केले असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी उघडपणे तांबे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झालेले दिसतात. काँग्रेस पक्षाचे देखील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते तांबे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत.

पदवीधर मतदार संघात अहमदनगर जिल्ह्यातील मतदार निर्णायक मतदान करणार आहेत. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण मतदारसंघात सलोख्याचे संबंध आहेत. तसेच मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे. सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी सर्वच पदाधिकारी कार्यरत राहतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!