भूमिगत गटार योजनेच्या काही चुकीच्या कामामुळे साई मंदिराकडे जाणारा पूल खचला — ॲड. श्रीराम गणपुले
नवीन पूलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातून स्वामी समर्थ मंदिराकडून साई मंदिर आणि गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद आहे. सदर पूल तातडीने दुरुस्त होणे शक्य नसल्याची चिन्हे आहेत. हा पूल भूमिगत गटारीच्या काही चुकीच्या कामामुळे खचला आहे. संगमनेर शहरातून या परिसरात जाणाऱ्या अनेक नागरिकांची सध्या अडचण होत आहे. त्यामुळे नवीन पूल उभारण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसर व साईनगर, पंपिंग स्टेशन या सर्व भागास जोडण्यासाठी पुर्वी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्डच्या अर्थसहाय्य विभागातून पुलासाठी निधी मिळवून दिला होता. सदर पुल जुन २०२२ पर्यंत वापरात होता. मात्र त्यानंतर सदर पुलाशेजारील भुमिगत गटार योजनेच्या कामात काही चुकीचे काम केले गेल्यामुळे सदर पुलाचे पहिले तीन गाळे खचले आहेत. त्यामुळे सदरचा पुल वापरास बंद झाला आहे.

पुलापलीकडे शाळा, ज्युनिअर कॉलेज अशा संस्था, रहिवासी उपनगरे आहेत. तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची जाण्या येण्याची कुचंबना होत आहे. त्याचप्रमाणे पुढे गंगामाई घाट परिसर आहे. सकाळी व संध्याकाळी शुध्द हवेसाठी वयस्कर नागरिक घाटावर फिरण्यासाठी ये जा करत होते. त्यांची देखील सहा महिन्यांपासुनअडचण झाली आहे.

जवळपास दहा हजार लोकसंख्या व गावातुन बाहेर पडण्याचा महत्वाचा मार्ग बंद आहे. तातडीने सदर पुलाची दुरुस्ती होणे शक्य नाही. तेवढयाच वेळात पर्यायी कमी उंचीचा कॉजवे पुल हा चव्हाणपुरा ते घोडेकर मळा – वेताळबाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधला तर तो लवकर पूर्ण होऊन अडचण दुर होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर नविन पुलासाठीचे इस्टीमेट रक्कम २ कोटी ८ लाख ४० हजार रुपयांचे केलेले आहे. मात्र सदर कामासाठी तातडीने निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. तरी जिल्हा स्तरावर पालक मंत्री या नात्याने आपण व्यक्तीगत लक्ष घालून योग्य त्या योजनेतून निधी उपलब्ध करुन दिल्यास चालू वर्षातच सदर पुलाचे बांधकाम सुरु होऊन नागरिकांची गैरसोय दूर होईल.

