सामाजिक बांधिलकी जोपासायची असेल तर आधी ‘स्व’ ची जाणीव व्हायला हवी — प्रा. सातपुते
प्रतिनिधी —
आपण समाजाला काही देणं लागतो ही भावना अलीकडे कमी झालेली आढळते. सामाजिक बांधिलकी जोपासायची असेल तर आधी ‘स्व’ ची जाणीव व्हायला हवी. आपल्या व्यक्तिगत जगण्यात समाजाचा विचार का हवा याची मांडणी करणारे लिखाण जास्तीत जास्त होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रा. सुशांत सातपुते यांनी केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास या उद्बोधन कार्यक्रमात ‘स्व’ संकल्पना व सामाजिक विकास या मार्गदर्शन पर व्याख्यानात सातपुते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, प्रा. राजू शेख, प्रा. सुवर्णा चौधरी आदी उपस्थित होते.

प्रा. सातपुते यांनी ‘स्व’ संकल्पनेतून सामाजिक विकास कसा साधायचा हे सांगितले. हे सांगताना कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायचे असेल तर आपल्याला आपली बलस्थाने, कमतरता, संधी व धोके ओळखता यायला हवीत.

‘स्व’ संकल्पना ही सामाजिक आंतरक्रियेतून विकसित होत असते. ‘स्व’चा अभ्यास हा व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळेच व्यक्तीला सुप्त गुणांचा विकास साधता येतो. त्यातूनच त्याला सुख दुःखावर मात करता येते.

सामाजिक,भावनिक व बौद्धिक विकास घडवण्यासाठी स्वतःचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. अवास्तव महत्त्वकांक्षांचे ओझे पूर्ण करत असताना स्वतःच्या जाणिवे पासून माणसे दूर जात आहेत. माणसं माणसांमध्ये आहेत पण तरीही एकटे आहेत ही गंभीर बाब आहे असा इशाराही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजू शेख यांनी केले. आभार प्रा. सुवर्णा चौधरी यांनी मानले.

