‘टीईटी’ नापास शिक्षकांना मुदतवाढ नाही ! सरकार

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना मुदतवाढ देता येणार नाही असे शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले

शिक्षक पात्रता परीक्षा ‘टीईटी’मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गुणवत्तेमध्ये आपण तडजोड करू शकत नाही. त्यामुळे ‘टीईटी’ उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना मुदतवाढ देता येणार नाही. यामध्ये केंद्र शासनानेही अट घालून दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. शिवाय मार्चपर्यंत ५० टक्के शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याने रिक्त पदांची समस्या सुटेल, असेही ते म्हणाले.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी भिवंडी-निजामपूर शहर महापालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी डॉ. भारती लव्हेकर यांनी ‘टीईटी’ अनुत्तीर्ण शिक्षकांना मुदतवाढ देऊन उत्तीर्ण होण्याची संधी द्यावी. यामुळे तीन हजारांवर शिक्षकांच्या नोकरी धोक्यात आल्याची माहिती दिली.

यावर केसरकर यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला. केसरकर म्हणाले की, शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक व दर्जात्मक बदल दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहितीही केसरकर यांनी दिली. लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉ. भारती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला. सौजन्य दैनिक लोकसत्ता

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!