गद्दारांना बरोबर घेतले तर नेतृत्वा सोबत राहणार नाही !
सिताराम राऊत यांचा थेट आमदार बाळासाहेब थोरात, आमदार तांबे यांना इशारा…
प्रतिनिधी —
घुलेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. पक्षातील आणि मंडळातील गद्दारांमुळेच हा पराभव झाला हे उघड आहे. मंडळाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता आमच्या नेतृत्वाने निवडणुकीत गद्दारी केलेल्यांना जवळ केले तर आम्ही नेतृत्वाबरोबर राहणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांना हा थेट इशारा समजला जात असून घुलेवाडी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीनंतर काँग्रेस अंतर्गत धुसपुस सुरू झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच दोन गट तयार होऊन एकमेकाविरुद्ध लढाई झाली. बऱ्याच ठिकाणी “हा पण आपला आणि तो पण आपला” अशी भूमिका आमदार थोरात यांनी राबवली आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आमदार थोरात यांची नेहमी अशीच भूमिका राहिली आहे.

सर्वच कार्यकर्ते नेते आमदार थोरात यांना मानणारे असल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणात कोणालाही दुखवायचे नाही. अशी भूमिका आमदार थोरात यांची असल्याने गावागावातील त्यांचे समर्थक दोन गट करून एकमेकांना भिडत असतात.

कोणीही निवडून आला तरी तो आपलाच असा सरळ साधा पवित्रा आमदार थोरात यांचा असतो. मात्र राजकारण ते राजकारण. दोन गटांमध्ये निवडणुकीच्या राजकारणातून किती भांडणे होतात, वाद होतो, कायमचे चांगले संबंध बिघडतात, नातेसंबंध, भाऊबंदांमध्ये दरी येथे याचा विचार मात्र केला जात नाही. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर आणि एकमेकांच्या संबंधावर होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

मागील वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत घुलेवाडी ग्रामपंचायती मध्ये आमदार थोरात यांच्या गटाचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यावेळी देखील ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली अशी मंडळी आमदार थोरात यांनी पुन्हा जवळ केले असल्याचे बोलले जाते.

त्यानंतर यावर्षी देखील आमदार थोरात यांचा गट असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेतकरी विकास मंडळाच्या माध्यमातून उभा केलेला उमेदवार पुन्हा गद्दारीमुळे पडला असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे. आता या गद्दारांना पुन्हा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जवळ केले तर आम्ही त्यांच्या सोबत राहणार नाही असा पवित्रा कार्यकर्त्यांचा दिसून येतो. सर्वच कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा निवडणुकीच्या निकालानंतर परिसरात सुरू आहे. गद्दारांविषयी नाराजी आणि चीड पसरली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी त्यास वाट मोकळी करून दिली आहे.

नव्याने झालेल्या निवडणुकीत जे सरपंच पदाच्या उमेदवार निवडून आले आहेत त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. इतर सर्व सदस्य आमच्या शेतकरी विकास मंडळाचे निवडून आले आहेत. परंतु आमच्याच मंडळातील काही लोकांनी गद्दारी करून विरोधी उमेदवाराच्या विजयासाठी जो मार्ग मोकळा करून दिला. विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. त्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. हे गद्दार नेहमीच छुप्या रीतीने आणि उघड देखील पक्षाच्या व नेतृत्वाच्या विरोधी काम करतात. हे नेतृत्वाला माहीत आहे. तरी अशा गद्दारांना आता जवळ करू नये आणि माफही करू नये. नाहीतर भविष्यात नेतृत्वाबरोबर राहायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल, असे स्पष्टपणे सिताराम राऊत यांनी “संगमनेर टाइम्स’ शी बोलताना सांगितले.

