कर्जमाफी व गायरान जमीन प्रश्नी धरणे आंदोलन सुरु
२६ नोव्हेंबर रोजी राज्यभर मोर्चे
प्रतिनिधी —
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये अर्थसहाय्य द्या, गायरान जमिनी ताबेदारांच्या नावे करा, वन जमिनी कसणारांच्या नावे करा, कर्जमाफी योजनांची अपुरी अंमलबजावणी पूर्ण करा, पात्र गरीबांचा दारिद्र्य रेषेच्या यादीत समावेश करा आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अकोले तहसील कार्यालयासमोर यानुसार शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले असून २६ नोव्हेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयांवर मोर्चा काढून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

अकोले तालुक्यातील विठा येथील ३५ आदिवासी कुटुंब वर्षानुवर्षे गायरान जमिनीत रहात आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे कारण देत या आदिवासींना जमिनीवरून निष्कासित करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. शासन व प्रशासनाने या आदिवासी गरीब कुटुंबांचे योग्य जागा देऊन पुनर्वसन करावे अन्यथा गायरान जमिनींवरील त्यांचा ताबा कायम करावा या मागणीसाठी विठा येथील ३५ ठाकर समाजाची कुटुंबे बेमुदत धरणे आंदोलनात सामील झाली असून कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता तहसील कार्यालया समोर ठाण मांडून बसणार आहेत.

राज्यभर शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून दोन वेळा कर्जमाफी झाली. अकोले तालुक्यातील पिंपरकणे, शेलविहीरे, मान्हेरे, टिटवी, तेरुंगण, बाबुळवंडी इत्यादी गावातील आदिवासी शेतकऱ्यांची थकीत पिककर्ज मात्र या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या याद्यांमधून वगळून टाकण्यात आली. आता या गरीब आदिवासी शेतकऱ्यांची कर्ज वसुली सुरु असून इतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना या आदिवासींना मात्र बँकांनी कर्ज वसुलीसाठी कोर्टात खेचले आहे. किसान सभेने या शेतकऱ्यांची बाजू घेत आंदोलन सुरु केले असून हे सर्व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहे.

किसान सभेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील ३००० गरीब कुटुंबांची दारिद्र्य रेषा यादीत समावेशासाठी अपिले दाखल केली आहेत. अपिलांची सुनावणी घेऊन पात्र लाभार्थींचा दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेश करावा, वन धन केंद्राना मान्यता द्यावी, संगमनेर तालुक्यातील वन जमीनधारकांची जि.पी.एस. मोजणी करून जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्यांसाठी सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे.

या आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, मथुराबाई बर्डे, भाऊसाहेब मेंगाळ, बहिरु रेंगडे, किसन मधे, दिलीप हिंदोळे, बाळू मधे, देवराम उघडे, शांताराम पथवे, वसंत वाघ, नाथा जाधव सहभागी झाले आहेत.

