मालदाड – सोनोशी- नान्नज रस्ता दुरुस्त करण्याची युवक काँग्रेसची मागणी 

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या निधीला विद्यमान सरकारने स्थगिती दिली असून यामध्ये समावेश असलेल्या मालदाड – सोनोशी – नान्नज दुमाला ते चिंचोली गुरव या रस्त्याची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याकरीता मंजूर झालेल्या निधी तातडीने मिळून या रस्त्याचे त्वरित मजबुतीकरण व डांबरीकरण व्हावे यासाठी मालदाड येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निवेदन दिले असून उपोषणाचा इशाराही दिला आहे.

मालदाड येथील युवक काँग्रेसच्या वतीने मालदाड – सोनोशी – नान्नज दुमाला – काकडवाडी -चिंचोली गुरव या रस्त्याच्या दुरुस्ती मागणीसाठीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी लक्ष्मण नवले, भाऊसाहेब नवले,मंगेश नवले, विपुल नवले, बाळासाहेब नवले,सुरेश नवले, अनिल नवले, उपसरपंच गणेश भालेराव,परसराम गोफने आदी उपस्थित होते.

या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील उत्तर भागाकरता नाशिक महामार्ग ते मालदाड, सोनोशी, नान्नज दुमाला, काकडवाडी ,चिंचोली गुरव, देवकवठे हा रास्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच रस्त्यावरती पारेगाव खुर्द ,पारेगाव बुद्रुक, सोनेवाडी तळेगाव या मधील नागरिकांचाही मोठा वावर असतो. या रस्त्याच्या दुरुस्ती मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला असून १९ किलोमीटरच्या या रस्त्या करता तत्कालीन सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर केला आहे. तसेच या रस्त्याचा समावेश प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये सुद्धा केलेला आहे.

मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर विविध विकास कामांच्या निधीला स्थगिती मिळाली आहे. या स्थगितीमध्ये या रस्त्याचा समावेश असल्याने या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून अनेक नागरिक वाहन चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व इतरांनाही निवेदन देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल न घेतल्याने आता युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

तातडीने या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास उपोषण करण्यात येईल असेही विपुल नवले व बाळासाहेब नवले यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!