प्रकल्प अधिकारी कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले ; अकोले पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले !
अंगणवाडी कर्मचारी सेविका कार्यकर्त्यांचे आंदोलन !
प्रतिनिधी —
निकृष्ट आणि बेचव आहाराची गुणवत्ता सुधारावी ही प्रमुख मागणी आणि हा आहार पुरवणाऱ्या संबंधित कंपन्या, ठेकेदार अधिकाऱ्यांचे साटे लोटे असल्याचा गंभीर आरोप करत विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांच्याशी बैठकीच्या वेळेस प्रकल्प अधिकाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली तसेच कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्ते व अंगणवाडी कर्मचारी महिलांनी पंचायत समितीत अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडून घेत कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अद्याप थांबलेले नाही. संबंधित अधिकाऱ्याने माफी मागितली असली तरी आंदोलन पुढेच चालू असल्याने आता पुढील निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान कोंडलेल्या अधिकाऱ्यांचे मुक्तता केली असली तरी आंदोलन मात्र सुरूच असल्याची माहिती कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे.

अंगणवाडी कर्मचारी ताईंच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलने होत असुन त्याचाच भाग म्हणून एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले व राजुर प्रकल्पांतर्गर असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंनी मागण्यांसाठी आज अकोले पंचायत समिती समोर मोर्चा व निदर्शने केली.

या संदर्भाने कर्मचारी महिला व कार्यकर्त्यांची प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा सुरू असताना प्रकल्प अधिकारी दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे वरील प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते.

अंगणवाडी कर्मचारी ताईंना प्रलंबित मानधनवाढ तातडीने लागू करा, ग्रॅज्युइटी (Gratuity) व पोषण ट्रॅकर ऍप बाबद सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे पालन करून अंगणवाडी कर्मचारी ताईंना त्याचा लाभ व्हावा यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करा, सर्वांना नवीन मोबाईल व मोबाईल मध्ये मराठी ऍप तसेच मोबाईल देखभाल खर्च तातडीने द्या, सर्व अंगणवाडी कर्मचारी ताईंसाठी मासिक पेन्शन द्या, सर्व सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रलंबित निवृत्ती मानधन / पेन्शन तातडीने अदा करा,

मिनी अंगणवाडी ताईना पुर्ण अंगणवाडीचा दर्जा लागू करा, मदतनिसांना सेविका पदी बढती बाबत निकष सोपे सरल करा, पात्र सेविकांची मोठ्या प्रमाणावर सुपरवायझरपदी भरतीची व बडती करा, किरकोळ आहाराच्या दरात वाढ करा, खर्चाची रक्कम १०००० रुपये मंजूर करा, सेवाज्येष्ठते प्रमाणे मानधनात वाढ लागू करा, दुर्गम भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता पुन्हा सुरू करा, अनेक अंगणवाडी ताईंचे गहाळ मानधन तातडीने अदा करा, निकृष्ठ व बेचव आहार पंचनामा करून पुरवठ्या बाबद तातडीने चौकशी करा व दोषींवर कारवाई करा,

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या अंगणवाडी इमारती ची नवीन बांधणी, दुरूस्ती साठी तातडीने उपाययोजना करा,आपल्या एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग, अकोले कार्यालयाकडून फसवणूक करून अन्याय झालेल्या शिवाजीनगर अंगणवाडी ताई श्रीमती अनिता धुमाळ यांच्या प्रकरणाची चौकशी करा व दोषींवर कार्यवाही करा, अंगणवाडी ताईंना आरोग्याच्या सोईनसह संपूर्ण कुटुंबाला मोफत ५ लाखाचा आरोग्य विमा लागू करा, थकीत प्रवास भत्ता, इंधन खर्च, अमृत आहार खर्च व थकीत बिल तसेच इतर देणे तातडीन अदा करा, व या सर्व खर्चासाठी आगाऊ रक्कम अंगणवाडी कर्मचारी ताईंना घेण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

