ओला दुष्काळ प्रश्नी उद्या व्यापक ऑनलाईन ट्रेंड मोहीम
प्रतिनिधी —
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या संकटात दिलासा देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत.

सरकारने या संकट काळात पुरेशा उपाययोजना कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी उद्या दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन ट्रेंड आयोजित केला आहे.

ओला दुष्काळ व त्या संबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स व पोस्ट दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करून समाजात या प्रश्नांबाबत जागृती निर्माण करणे व सरकारला या बाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडणे असा या ऑनलाईन ट्रेंडचा उद्देश आहे.

राज्यभरातील संवेदनशील बुद्धिजीवी, लेखक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते या मोहिमेत सामील होत आहेत. किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या भ्रातृभावी संघटनांनी या मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये मदत करावी व अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी या मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. विविध शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटना, विद्यार्थी, युवक व महिला संघटना या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

नागरिकांनीही या ट्रेंड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

