शिक्षणमंत्र्यांना छात्रभारतीने पाठवला काळा आकाश कंदील !
प्रतिनिधी —
पटसंख्या कमी असण्याच्या कारणाखाली राज्य सरकारने राज्यातील परिषदेच्या हजारो मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या पातळीवर विरोध प्रदर्शन सुरू आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सुरुवातीपासूनच या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. आज संघटनेच्या वतीने निषेध म्हणून राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील पाठवला आहे.

राज्य शासनाने राज्य भरातील कमी पटसंखेच्या शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. छात्रभारती ने त्या निर्णयाला कडक विरोध केला आहे.

शाळा बंद केल्याने गोर गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जातील. आदिवासी भागातील मुलांचे तर कायमचेच शिक्षण बंद होऊन जाईल. याचा शाळांवर जाऊन छात्रभारती ने सर्व्हे सुद्धा केला आहे.

राज्य सरकार मात्र शिक्षण बंद करण्याच्या मागे लागले आहे. असे आता लक्षात येत आहे. हा निर्णय रद्द करावा व त्या निर्णयाचा निषेध म्हणून छात्रभारती विद्यार्थी संघटना संगमनेर च्या वतीने पोस्टाच्या मार्फत शिक्षणमंत्री यांना ‘काळे आकाशकंदील’ पाठवून शाळा बंदी चा निषेध केला आहे.

या वेळी छात्रभारती चे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सदस्य तुषार पानसरे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, गणेश जोंधळे, राधेश्याम थिटमें उपस्थित होते.

