संतप्त आदिवासींची दिवाळी वीज मंडळाच्या कार्यालयात !
संगमनेर कार्यालयाला ठोकणार टाळे !!
प्रतिनिधी —
आश्वासन देऊनही आदिवासी ठाकरवाडीला वीज पुरवठा सुरू न केल्याने संतप्त आदिवासींनी वीज मंडळाच्या कार्यालयातच आंदोलन सुरू केले आहे. पिढ्यानपिढ्या झोपडीच्या अंधारात दिवाळी साजरी करण्या ऐवजी आंदोलनात सामील होऊन वीज कार्यालयात काळी दिवाळी साजरी करू असा संकल्प या आदिवासी शेतकऱ्यांनी केला आहे.

पिंपळगाव खांड येथील आदिवासी ठाकरवाडीला वीज मिळावी यासाठी आदिवासी श्रमिकांनी कोतुळ येथील वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रात्रीही आंदोलक कार्यालयातच मुक्कामी राहणार असून प्रत्यक्ष वीज मिळाल्या शिवाय मुक्काम हलवणार नसल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे.

दोन वर्षांपूर्वी मुळा नदीवर पूल व्हावा व पिंपळगाव खांड येथील आदिवासींना वीज मिळावी या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली १२ दिवसांचे रात्रंदिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेकडो आदिवासी १२ दिवस कोतुळच्या मुख्य चौकात बसून होते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन्ही मागण्या मान्य केल्या. कोतुळ पुलाची वर्क ऑर्डर आंदोलनाच्या मंडपातच देण्यात आली. पुढे पुलाचे कामही करण्यात आले. मात्र त्याच आंदोलनाच्या मंडपात पिंपळगाव खांड धरणाच्या उशाला असलेल्या आदिवासी ठाकरवाडीला वीज देण्याचे आश्वासन मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही पूर्ण करण्यात आले नाही.

अखेरीस येथील गरीब आदिवासींना घेऊन भर दिवाळीत कोतुळ येथील वीज मंडळाच्या कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याची वेळ किसान सभेवर आली आहे.

आदिवासींना वीज मिळावी यासाठी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निधीची तरतूद केली. मात्र आणखी मलिदा मिळावा यासाठी इ टेंडर भरलेल्या ठेकेदाराने हेतूत: आदिवासींना गेली दोन वर्षे अंधारात ठेवण्याचे पाप केले आहे. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून पर्यायी यंत्रणेकडून पोल उभे करून घ्यावेत व दिवाळी पूर्वी आदिवासींना वीज द्यावी अशी मागणी किसान सभा करत आहे.

पिंपळगाव खांड येथील ५० पेक्षा अधिक गरीब आदिवासींनी कोतुळ येथील वीज मंडळाच्या कार्यालयात या मागणीसाठी मुक्काम ठोकला असून कार्यालयातच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदाशिव साबळे, जिल्हा सचिव नामदेव भांगरे, तालुका अध्यक्ष एकनाथ गिऱ्हे, तालुका समिती सदस्य निवृत्ती डोके, किसन मधे, राऊजी पारधी, नाथा जाधव, बाळू डोके, भीमा डोके आंदोलनाचे नेतृत्व करत असून पिंपळगावचे सरपंच विजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य सागर शेटे, कोतुळ येथील कार्यकर्ते रवी आरोटे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

विजेचा प्रश्न न सुटल्यास वीज मंडळाच्या संगमनेर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

