संगमनेर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहिर करा — मनसे
प्रतिनिधी —
सध्या सर्वत्र पाऊस सुरु असून संगमनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सणासुदीला शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावला आहे. सरकारने संगमनेर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेरच्या वतीने करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन सना सुदीच्या काळात शेतमाल कवडी मोल भावात विकावा लागतोय. त्यामध्ये व्यापारी वर्ग हा कोपलेल्या निसर्गाचा फायदा उठवत भिजलेला शेतकऱ्याचा शेतमाल सोयाबीन, मका, बाजरी निम्या पेक्षा कमी दराने घेत आहे. अशा व्यापारी वर्गावर रीतसर कारवाई करावी भिजलेल्या मालाचे सुद्धा रीतसर सरसकट पंचनामे व्हावेत.

अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी ढासाळलेल्या असुन विद्युत पंप बुडालेले आहेत. याचेही पंचनामे व्हावेत. प्रशासनाने अद्याप पंचनामे चालू केलेले नाहीत. ते तातडीने चालू करावे. पंचनामे करत असताना सरसकट करावेत. कुणावरही अन्याय होता कामा नये. शेतकऱ्यांना तातडीची मदत होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व ह्या संकटातून शेतकरी बाहेर येईल यासाठी प्रयत्न करावे

असे निवेदन संगमनेरचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्याकडे आज देण्यात आले. निवेदनाची योग्य दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

जिल्हाउपाध्यक्ष शरद गोर्डे, तालुकाअध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, उपाध्यक्ष तुषार बढे, रामा शिंदे, आकाश भोसले, प्रशांत दातीर, संदीप नवले, संदीप गाडेकर, महेश उदमले सचिव संजय शिंदे या सर्व पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

