अखेर… त्या चिमुरड्यांची शाळा पुन्हा सुरू!
दप्तर विसर्जन आंदोलन मागे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
राज्य सरकारने बंद केलेली मराठी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चिमूरड्यांनी आंदोलन केले होते. “दप्तर घ्या, बकरी द्या” जिल्हा परिषदेवर केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगली धावपळ उडाली होती. त्यावेळी या मुलांना तुमची शाळा पुन्हा सुरू केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शाळा सुरू न झाल्याने मुलांनी पुन्हा धोम धरणाच्या पाण्यात “दप्तर विसर्जन” आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र खडबडून जागेवर आलेल्या प्रशासनाने या चिमुरड्यांची यांची शाळा सुरू केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील ४३ विद्यार्थ्यांची शाळा कमी पटसंख्या व इतर कारणाने बंद करण्यात आली होती. त्यांनी जिल्हा परिषदेवर धडकदेत “दप्तर घ्या, बकऱ्या द्या” आंदोलन केल्यानंतर तीपुन्हा सुरु झाली. शाळा कायमस्वरुपी सुरू राहील किंवा नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र या वादावर शुक्रवारी पडदा पडला. इगतपुरी तहसील कार्यालयात गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शाळा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरेवाडी या गावातील ग्रामस्थांची जागा भाम धरणात गेली. विस्थापितांसाठी त्या भागात शाळा सुरू करण्यात आली. मात्र काही महिन्यांपासून शाळा समायोजनचा मुद्दा चर्चेत आल्याने शाळा बंद राहिली. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराखाली नाशिक जिल्हा परिषदेवर धडक दिली. दप्तर घ्या आणि बकऱ्या द्या, अशी प्रशासनाला साद घालत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. या आंदोलनानंतर बुधवारी शाळा नियमितपणे आहे त्या जागेवर भरली.

परंतु, शिक्षणाधिकारी भास्कर कनोजिया यांनी शाळा समायोजनसंदर्भात वेगवेगळी विधाने केल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी भाम धरण परिसरात “दप्तर विसर्जित” करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर , शुक्रवारी सकाळी पोलिसांनी दरेवाडी येथील विस्थापितांची वस्ती गाठत पालकांशी चर्चा केली. पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दप्तर विसर्जनाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. अखेर ती विद्यार्थी आणि पालकांनी मान्य केली. तरिही शाळा सुरू राहण्याविषयी संभ्रम असल्याने गट शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, तहसीलदार यांनी सामाजिक कार्यकर्ते व पालक यांची बैठक घेत शाळा नेहमीप्रमाणे सुरु राहील असे आश्वासन दिले.

