संगमनेर शहरातील रुग्णालयांना नगरपालिकेची नोटीस !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील अनधिकृत, नियमबाह्य, नूतनीकरण परवाना समाप्त व नवीन युडीसीपीआर नियमात नसणाऱ्या रुग्णालयांवरील कारवाई संदर्भात राष्ट्रीय छावा संघटनेच्या उपोषणाची नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली असून शहरातील दहा ते बारा रुग्णालयांना नोटीशी बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आली आहे. तसेच संघटनेच्या सर्व तक्रारीच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी साधारणपणे एक महिना कालावधी लागेल असे प्रशासनाने कळविल्याने राष्ट्रीय छावा संघटनेने उपोषण मागे घेतले आहे.

दरम्यान शहरातील काही रुग्णालयांच्या काही इमारतींची तपासणी देखील नगरपरिषदेच्या संदर्भात संबंधित विभागाने केली आहे. तसेच इतर रुग्णालयाच्या इमारतींची तपासणी होणार असल्याचे नगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय छावा संघटनेने संगमनेर शहरातील रुग्णालयांकडून होत असलेली रुग्णांची लुटमार, तसेच अवैध, विनापरवाना, बेकायदेशीर रुग्णालयांची बांधकामे, नियमबाह्य रुग्णालयातील सुविधा याबाबत तक्रार नोंदवत नगरपालिका कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत नगरपालिकेने वरील कार्यवाही सुरू केली आहे.

संगमनेर शहरातील रुग्णालयांच्या आणि वैद्यकीय सेवां वादग्रस्त बाबीं बाबत तक्रारी यापूर्वी देखील झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील काही तपासण्या होणार असल्याची माहिती समजली आहे.

दबाव आणणाऱ्या डॉक्टर्स वर कायदेशीर कारवाई करा…
दरम्यान काही डॉक्टर्सनी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती समजली असून राजकीय हस्तक्षेप देखील करण्याचा प्रयत्न झाला आहे. वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असून आम्ही रुग्णालय बंद करू अशी धमकी देत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रशासन सर्व पावले सावधगिरीने आणि कायदेशीररित्या उचलत आहे. तपासणी केल्याने रुग्णालय चालकांमध्ये एवढी भीती का ? असा प्रश्न उपस्थित होत असून दमबाजी करणाऱ्या व दबाव आणणाऱ्या डॉक्टर्स वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

