बेसुमार वाळू उपश्या मुळे शांतीघाट धोक्यात !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातून गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या माळुंगी नदीवरील भरभक्कम पूल गेल्या महिन्यापूर्वी तुटला आहे. हा पूल भक्कम असून सुद्धा कशामुळे, तुटला कसा तुटला हा चर्चेचा विषय आहेच आणि त्याबाबत संभ्रम आहे. मात्र पुलाच्या पायाजवळ बेसुमार वाळू उपसा झाल्याने हा पुल तुटला असावा अश्या शंका व्यक्त होत आहेत.

ही घटना ताजी असतानाच आता प्रवरा आणि माळुंगी नदीच्या संगमावरील दशक्रिया विधीचा शांतीघाट सुद्धा बेसुमार वाळू उपशामुळे धोक्यात आला आहे.

नदीच्या संगमावर नगरपालिकेने दशक्रिया विधी करण्यासाठी शांतीघाटाची निर्मिती केली आहे. या शांती घाटाच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. शांती घाटाचे हे बांधकाम महाळुंगी आणि प्रवरा नदीच्या पात्रातच बांधण्यात आल्याने त्याबाबत ही अनेक विचार व मतप्रवाह आहेत.
हे बांधकाम वादग्रस्त ठरले आहे. आणि धोकादायक असल्याचे आरोपही करण्यात आलेले आहेत.

पावसाळ्यात दोन्ही नद्यांना पाणी आल्यावर शांती घाट पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला असतो. त्याचवेळी या घाटाचे लोकेशन चुकले असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे. असे असताना आता याच शांतीघाटाच्या आजूबाजूला होणाऱ्या बेसुमार वाळू उपशामुळे भविष्यात हा शांतीघाट पाणी आल्यावर तुटून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संगमावर बांधलेला हा शांतीघाट दशक्रिया विधीसाठी वापरण्यात येतो. मात्र या ठिकाणी रोज बेसुमार वाळू उपसा होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. वाळू तस्करांनी या ठिकाणी खोदलेले खड्डे खोल होत आहेत. या खड्ड्यांमुळे भविष्यात शांतीघाट तुटून वाहून जाण्याची शक्यता अनेक नागरिक व्यक्त करतात.

वाळू तस्करावर मात्र कुठलीच कारवाई होत नाही. राजरोसपणे ही वाळू चोरी सुरू आहे. शांती घाटावर दशक्रिया विधी सुरू असला तरी या वाळू चोरांना कोणाचीच भीती राहिली नसल्याने दिसते.


दशक्रिया विधी एका बाजूला आणि दुसरीकडे वाळू चोरी सुरू असल्याचे चित्र नागरिकांनी पाहिले आहे. नगरपालिका, पोलीस आणि महसूल प्रशासन अशा वाळू चोरीला खतपाणीच घालत असल्याचे दिसते. या वाळू चोरांचे लागेबांधे असल्याने वाळू चोरी करणारे निर्ढावलेले असल्याचे आरोप होत आहेत.

एकंदरीत पाहता वाळू उपशामुळे संगमनेर शहरा लगत गंगामाई घाट ते प्रवरा नदीवरील मोठा पूल या परिसरापर्यंत अजून काय काय पहावे लागणार आहे हे भविष्यात दिसेलच. तत्पूर्वी या वाळू चोरट्यांवर कारवाई करणार कोण ? हा सवाल निर्माण झाला आहे.

