१८ नोव्हेंबर रोजी ‘निसर्गोपचार व योग’ या विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी —
जागतिक प्राकृतिक चिकित्सा दिनाचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री. माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने ‘ निसर्गोपचार व योग’ या विषयावर निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. ललितबिहारी जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्राच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जे रुग्ण आहेत त्यांनी व्याधींवर कशी मात करावी यासाठी आणि जे निरोगी आहेत त्यांनी भविष्यातही निरोगी राहण्यासाठी या व्याख्यानाचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहान करण्यात आले आहे.

सदरचे व्याख्यान शुक्रवारी सायंकाळी ७.३० ते ८ .३० या वेळेत केंद्राच्या सभागृहात (संगमनेर महाविद्यालयासमोर) होणार आहे. व्याख्यानानंतर सात्विक भोजनाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नावनोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.

मालपाणी परिवाराने शिक्षण प्रसारक संस्थेला दिलेल्या आर्थिक सहयोगातून श्री माधवलाल मालपाणी यांच्या नावाने २०१६ पासून ५० खाटांचे अत्याधुनिक निसर्गोपचार व योग केंद्र सुरु करण्यात आले आहे.

देशातील ग्रामीण भागात इतके सुसज्ज निसर्गोपचार केंद्र कार्यरत असणे ही सर्वत्र कौतुकाची गोष्ट ठरली आहे. मागील सहा वर्षात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाना, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, दिल्ली इत्यादी ठिकाणच्या रुग्णांनी येथे उपचारांचा लाभ घेऊन नवसंजीवनी मिळविली आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर महाविद्यालयाच्या समोर निसर्गरम्य परिसरात असलेल्या या केंद्रात येथील अत्याधुनिक व परिपूर्ण सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर्स, कुशल व आपुलकीने सेवा करणारा कर्मचारी वर्ग यामुळे रुग्णांना व्याधीमुक्त होण्यासाठी वातावरण पोषक आहे.

केंद्रात दररोज बाह्य रुग्ण सेवा नियमितपणे सुरु असते. निवासी उपचारासाठी डिलक्स रूम्स असून त्यात आंतर रुग्ण सेवा दिली जाते. विविध प्रकारची औषधे येथे सवलतीच्या दरात रुग्णांना दिली जातात.अगोदर नोंदणी केल्यास शास्त्रशुद्ध सात्विक भोजनाची सुविधा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध करून दिली जाते. केंद्रप्रमुख डॉ. ललितबिहारी जोशी व त्यांचे सर्व सहकारी समर्पित भावनेने रुग्णसेवा करीत असल्याने अल्पावधीतच केंद्राने मोठा नावलौकिक मिळविला आहे.

