“महाराष्ट्रात BF 7 चा एकही करोना रुग्ण नाही, पण…”
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
महाराष्ट्रात बीएफ ७ या प्रकाराचा कोणताही करोना रुग्ण आढळून आला नाही. चार रुग्ण भारतात आढळून आले आहेत, त्यात गुजरातमध्ये दोन आणि ओडीसात दोन, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पण, कृपया मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.
दरम्यान चीनमध्ये करोनाचं थैमान असल्याने भारतात नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

जगात करोना वाढत असताना रुग्णालयात औषधांची कमतरता; माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा
चीन, जपान, साऊथ आफ्रिकासह इतर काही देशांत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातही चिंता वाढली आहे. हा आजार वाढू नये म्हणून संशयितांची ट्रेकिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे. सध्या औषधांची रुग्णालयात कमी असून तातडीने आरोग्य यंत्रणा सक्षम करा, अशी मागणी माजी आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांनी केली.

विधान भवन परिसरात ते बोलत होते. टोपे पुढे म्हणाले, चीनमध्ये सध्या टाळेबंदी लावण्यात आली. जगात करोनाचा नवा व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे. आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात बघायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे.

सोबतच तत्कालीन सरकारने तालुका रुग्णालय स्तरावर उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटसह इतर यंत्रणांची तातडीने तपासणी करून देखभाल- दिरुस्ती करण्याची गरज आहे. राज्यात सर्वत्र आयसोलेश वॉर्ड सज्ज ठेवणे, औषधांची पूर्तता करणे, आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे. सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे, टोपे म्हणाले. सौजन्य दैनिक लोकसत्ता


