सहकार क्षेत्राकडे करीअरची संधी म्हणून पाहा – खडके

राष्ट्रीय सहकार सप्ताहास प्रारंभ

प्रतिनिधी —

विकासाला कारणीभूत ठरलेल्‍या सहकार चळवळीने मजबुत असे संस्‍थाचे संघटन निर्माण केले आहे. या क्षेत्राकडे आता सहकारातील व्‍यवस्‍थापनाचे करिअर म्‍हणून पाहिले पाहीजे. सहकार चळवळ समजुन घ्‍यायची असेल तर गावपातळीवरील सेवा सहकारी सोसायटीच्‍या सचिवाचे मित्र बना असा मौलिक संदेश निवृत्‍त सहकार उपायुक्‍त संजीव खडके यांनी विद्यार्थ्‍यांना दिला.

राष्‍ट्रीय सहकार संस्‍थांचा महासंघ यांच्‍या वतीने १४ नोव्‍हेंबर ते २० नोव्‍हेंबर या कालावधीत राष्‍ट्रीय सहकार सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या निमित्‍ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अध्‍यासनाच्‍या वतीने ७ महाविद्यालयामध्‍ये व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सप्‍ताहाची सुरुवात पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील व्‍याख्‍यानाने करण्‍यात आली.

निवृत्‍त सहकार उपायुक्‍त संजीव खडके यांनी ‘सहकार विकासाची नांदी’ या विषयावर विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला डॉ.विखे पाटील अध्‍यासनाचे प्रमुख डॉ. मुकूंद तापकीर, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, उपप्राचार्य डॉ. बी.डी रणपिसे आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या मार्गदर्शनपर भाषणात संजीव खडके यांनी गावपातळीवरील सेवा सोसायट्यांपासून ते देशपातळीवर काम करणा-या अमुल उद्योग समुहाच्‍या वाटचालीचे दाखले देवून सांगितले की, सहकार चळवळीचे हे विकासात्‍मक काम आहे. कुठल्‍यातरी एखाद्या सहकारी संस्‍थेची पडझड झाली तर, या चळवळीत अस्‍वस्‍थता होवून ही चळवळ बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न होतो.

मात्र सहकारी तत्‍वाने आज राज्‍यात ४५० बॅंकामध्‍ये ५ लाख कोटींच्‍या ठेवी आहेत. केवळ सामान्‍य माणसाला या बॅंकामध्‍ये व्‍यक्तिगत मि‍ळणारी सेवा कारणीभूत ठरली आहे. ही परिस्थिती कार्पोरेट बॅंकामध्‍ये आपण पाहू शकत नाही. त्‍यामुळेच सहकाराने जोडण्‍याचे काम केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रामध्‍ये व्‍यवस्‍थापनाचा एक चांगला गुण आहे, त्यामुळे विद्यार्थ्‍यांना या क्षेत्रात करिअर करण्‍याची चांगली संधी असल्‍याचे नमुद करुन, खडके म्‍हणाले की, व्‍यवस्‍थापन कौशल्‍य हे या चळवळीतच घडू शकते. तुम्‍हाला सहकार समजून घ्‍यायचा असेल तर गावपातळीवरील सेवा सचिवाचे पहिले मित्र व्‍हा, संस्‍थेचे उपविधी वाचा, या चळवळीचा पुर्ण अभ्‍यास तुम्‍हाला करता येईल असे त्‍यांनी विद्यार्थ्‍यांना सुचित केले.

डॉ.मुकूंद तापकीर यांनी सहकार चळवळीच्‍या माध्‍यमातून १३० देशांमध्‍ये सुरु आहे. देशातील आर्थिक, सामाजिक परिवर्तनात या चळवळीचे योगदान खुप मोठे आहे.

या चळवळीचे गुणात्‍मक नेतृत्‍व महाराष्‍ट्राकडे आले कारण पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ आणि वैकूठंभाई मेहता या महनीय व्‍यक्तिंनी सहकार चळवळीचा पाया भक्‍कमपणे रोवला. त्‍यामुळेच दर पाचव्‍या माणसामध्‍ये एक माणूस सहकार चळवळीशी जोडला गेला असल्‍याचे सर्वेक्षणात दिसून येते.

मलेशिया सारख्‍या देशामध्‍ये विद्यार्थ्‍यांच्‍या माध्‍यमातून १० हजार सहकारी भांडर यशस्‍वीपणे चालविले जातात याचे कारण आर्थिक उत्‍कर्षाबरोबरच कमकूवत माणसाला बळकटी देण्‍याचे काम सहकाराच्‍या मुलमंत्राने केले असल्‍याकडे त्‍यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. उपप्राचार्य डॉ.डी.बी रणपिसे यांनी प्रास्‍ताविक करुन, सहकार सप्‍ताहा मागची भूमिका विषद केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!