दांडी यात्रेप्रमाणेच भारत जोडो यात्रा ऐतिहासिक – आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी या विरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत.

आमदार थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे. महाराष्ट्रात देगलूर येथे आगमन झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांना अभिवादन करून सुरू झालेल्या या यात्रेचे राज्यातील जनतेकडून अभूतपूर्व स्वागत झाले आहे.

प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देणारी यात्रा असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडीयात्रेप्रमाणे ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. दांडी यात्रेने देशात क्रांती केली. देश एक केला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून देशहिताची व प्रेमाची ही ऊर्जा एक ऐतिहासिक चळवळ ठरणार आहे.

या यात्रेमध्ये साहित्यिक, कवी, संपादक, लेखक यांच्यासह विविध घटकातील लोक सहभागी होत आहेत. गोरगरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी महिला यांचा मोठा सहभाग राहिला असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी यात्रा स्वातंत्र्याची दुसरी लढाई ठरणारी आहे.

देशात सध्या जाती धर्माच्या नावावर मनभेद करण्याचे सोपे राजकारण सुरू असून त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी ही यात्रा होत असून या यात्रेची आपण सर्व साक्षीदार होणार आहोत.

भारताच्या इतिहासात या यात्रेला मोठे अनन्य महत्त्व राहणार असून बेरोजगार, कष्टकरी, कामगार यांच्या विविध प्रश्नांसाठी या यात्रेतून लोकचळवळ उभी राहिली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ही यात्रा ३८४ किलोमीटरचा प्रवास करणारा असून १४ दिवसांमध्ये शेगाव येथे दुसरी भव्य सभा होणार आहे. या सभेची तयारी आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यामध्ये राज्यातील सर्व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे.

भारत जोडो यात्रेमध्ये राज्यभरातील विविध कार्यकर्त्यांसह अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातीलही कार्यकर्ते सहभागी झाले आहेत युवक नेते सत्यजित तांबे हे आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.

