“मी बेरोजगार, आईला धीर द्या ! तरुणाची सत्यजीत तांबेंना कळकळीची विनंती
– ‘भारत जोडो’ यात्रेत बेरोजगार तरुणांनी घेतली सत्यजीत तांबेंची भेट
प्रतिनिधी —
पदरात इंजिनिअरिंगची पदवी असूनही नोकरी नसल्याने हताश झालेल्या बेरोजगार तरुणांचा गट काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला. या तरुणांना यात्रेत अग्रभागी चालणारे सत्यजीत तांबे दिसले आणि बेरोजगार तरुणांनी मोठ्या आशेने त्यांच्याकडे धाव घेत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी एका बेरोजगार तरुणाने त्याच्या आईला फोन लावत तांबे यांना तिला धीर देण्याची विनंती केली. तांबे यांनीही त्या माऊलीशी संवाद साधत त्यांना आधार दिला.

देशातील वाढती बेरोजगारी, डळमळीत अर्थव्यवस्था आणि सामाजिक दुही यांना उत्तर म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांमधून महाराष्ट्रात पोहोचली. नांदेडच्या देगलुरमध्ये या यात्रेचं स्वागत झालं. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि जनसामान्यही एकवटले होते.

यात्रेच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील अनेक तरुणांचा सहभागही लक्षणीय होता. या तरुणांनी यात्रेदरम्यान काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांची भेट घेत त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. ‘हे तरुण सुशिक्षित आहेत. त्यांच्यापैकी काही इंजिनिअर आहेत. पदवी असूनही त्यांना नोकरी नाही. सोशल मीडियावरील माझ्या भाषणांच्या पोस्ट त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे ते मला उत्स्फूर्तपणे भेटायला आले. त्यांच्या मनातील अनेक प्रश्न त्यांनी विचारले. त्यांची समाधानकारक उत्तरं मी देऊ शकलो की नाही, माहीत नाही. पण हा संवाद प्रेरणादायी होता’, तांबे यांनी या भेटीबाबत सांगितलं.

या संभाषणादरम्यान एका तरुणाने तांबे यांना त्याच्या आईशी फोनवर संपर्क साधण्याची विनंती केली. ‘तुम्हीच तिला धीर द्या’, असं तो तांबे यांना म्हणाला. आपला लेक इंजिनिअर होऊनही त्याला नोकरी लागत नाही, म्हणून ती माऊली चिंताग्रस्त होती. तिच्याशी मी कसेबसे चार शब्द बोललो आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्याशी बोलताना मला कसंनुसं झालं होतं, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

या अनुभवाबद्दल बेरोजगार तरुणांपैकी एकाने पोस्टही केली. उदगीरच्या भूषण घुगे या तरुणाने सत्यजीत तांबे यांचे आभार मानले. मी तुमच्या कौशल्याची प्रशंसा करतो आणि तुमच्यासोबत पुढे जाण्याबद्दल मला खूप सकारात्मक वाटते. लवकरच तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे, असं भूषणने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या यात्रेतील हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा अनेक मातांना आज आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनीच ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हायला हवं, असं आवाहन तांबे यांनी केलं.

